शितल अमराळे यांची सुवर्णभरारी

Shital-Amrale
Shital-Amrale

अमराळे ज्वेलर्स या वर्षी रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. या यशात शितल बाळासाहेब अमराळे यांचा खारीचा वाटा आहे. अथक कष्ट, जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा आणि त्याला दिलेली समाजकार्याची जोड यामुळे महात्मा फुले मंडईजवळील शिवाजी रस्त्यावर १९९६ मध्ये लावलेल्या अमराळे ज्वेलर्स या एका रोपट्याचे आज सुवर्ण वटवृक्षात रूपांतर झाले आहे. फडतरे चौक, लक्ष्मी रस्ता तसेच पिरंगुट या ठिकाणी भव्य ज्वेलरीचे शोरूम ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. महिला दिनानिमित्त शितल अमराळे यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

ग्राहकांचा विश्वास हाच व्यवसायाचा आत्मा व दैवत आहे. याच तत्त्वावर विश्वास ठेवत अमराळे ज्वेलर्सने लाखो नागरिकांचा विश्‍वास संपादन केला आहे. शितल अमराळे यांचे बालपण मंडई परिसरात गेले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यांच्या व्यवहारी ज्ञानाला तोड नाही. कोणतेही काम अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने झाले पाहिजे व त्यात स्वतःला झोकून दिले तरच आपल्याला यश प्राप्त होते अशी त्यांची मान्यता आहे. आणि त्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्याच बरोबर तुमच्याकडे प्रामाणिकता, दिशा व दूरदृष्टी असेल तर तुमच्याकडे यश आपोआप येते असा त्यांचा विश्‍वास आहे. 

पती बाळासाहेब अमराळे हे सामाजिक, राजकीय , सहकार क्रीडा व धार्मिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं काम त्यांनी केले. अनेकदा बाळासाहेब अमराळे यांना सामाजिक कार्यामुळे घरी लक्ष देता येत नव्हते. पण त्यांनी एकहाती कौटुंबिक व व्यावसायिक किल्ला लढवत मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उद्योग व्यवसाय सांभाळण्याचे आवाहन यशस्वीपणे पेलवले. आज त्यामुळेच त्यांची मुले सौरभ व स्वप्नील अमराळे हॉटेल व ज्वेलरी व्यवसायात यशस्वी झाले आहेत.

शितल अमराळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सोन्यामधील काहीच माहिती नसताना त्यांनी या व्यवसायात पूर्णपणे लक्ष घातले आणि त्यांनी पाहता पाहता आज लक्ष्मी रस्त्यावर सुवर्ण व्यवसाय उभा केला. महत्त्वाचे म्हणजे ज्या कापडाच्या दुकानात बाळासाहेब अमराळे यांनी १०० रुपयांवर काम केले. त्या ठिकाणी त्यांनी सोने विक्रीचे शोरूम उभे केले. त्याचबरोबर पिरंगुट मध्येही अमराळे ज्वेलर्सचे भव्य शोरूम उभे केले. व मुळशीमध्ये अल्पावधीत लोकाभिमुख झाले. 

महिलांनी घराच्या बाहेर पडून उद्योग व्यवसाय उभारला पाहिजे यासाठी शितल अमराळे या प्रयत्न करत आहेत. विविध महिलांना त्या वेळप्रसंगी आर्थिक मदतही करतात. त्यांच्या या प्रवासाला बाळासाहेब अमराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.

मंडईमध्ये सुरू केलेल्या अमराळे ज्वेलर्सच्या दुकानाचा विस्तार आज लक्ष्मी रस्ता आणि पिरंगुटमध्ये पाहता अभिमान वाटतो.  या वर्षी अमराळे ज्वेलर्स दिमाखाने रौप्य महोत्सव साजरा करत आहे. त्या पाठीमागे कुटुंबाने घेतलेले परिश्रम, चिकाटी, जिद्द, ग्राहकांचा जिंकलेला विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब खंबीरपणे मागे उभे असल्याने आम्ही हा प्रवास करत आहोत. मुलीप्रमाणेच असणाऱ्या सुना धनश्री, श्रद्धा यांचे पदवी व एमबीएचे शिक्षण लग्नानंतर पूर्ण केले आणि त्यांना व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज त्याही यशस्वीरीत्या व्यवसाय सांभाळत आहेत. 
- शितल अमराळे

शितल यांना मंडईतील कापडाच्या दुकानात (विक्रांत सिलेक्‍शन) कामाचा अनुभव असल्याने त्या मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम होत्या. आजही त्या पहिल्या सारख्याच सुवर्ण व्यवसायात लक्ष देऊन काम करीत आहेत.  आज त्यांनी सुवर्ण व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर उद्योग व्यवसाय सांभाळत असतानाच कुटुंबाकडेही तेवढ्याच तीव्रतेने जातीने लक्ष देत सर्वांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम त्या करत आहेत. विशेष म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या कोणतीही कुटुंबाची पार्श्वभूमी नसताना त्या या व्यवसायात मोठी भरारी घेत आहेत. स्त्रीला कर्तृत्व दाखवण्यासाठी पुरुषांनी स्वातंत्र्य दिले, तर ती त्रिलोकी व्यावसायिक झेंडा फडकाऊ शकते. 
- बाळासाहेब अमराळे 

आज वयाच्या ५५ व्या वर्षी आई जोमाने सुवर्ण व्यवसायात काम करीत आहे. कुटुंबासमोर अनेक वाईट प्रसंग आले पण तिने धीटपणे त्याचा सामना केला. तिने पुढील पिढ्यांना आदर्श घालून दिला आहे. स्वतःच अस्तित्व आईने स्वकष्टाने निर्माण केले आहे. कधी हार मानायची नाही हे मी तिच्याकडून शिकलो. 
- स्वप्नील अमराळे

(शब्दांकन - महेश जगताप)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com