राज्यातल्या सत्ताबदलाकडून पुण्याच्या अपेक्षा

महाराष्ट्रात नव्याने होत असलेले सत्तांतर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
Shaniwarwada
ShaniwarwadaSakal
Summary

महाराष्ट्रात नव्याने होत असलेले सत्तांतर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात नव्याने होत असलेले सत्तांतर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम पुणे शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांवर होणं अपेक्षित आहेच; शिवाय याचा परिणाम आगामी महापालिका निवडणूका आणि शहरातील भाजपच्या संघटनेवरही होईल.

पुण्याच्या विकासाला गती मिळावी

देशातील मोदी सरकारच्या शहर विकास धोरणात पुणे शहराला मेट्रो, जायका, नदीसुधार, स्मार्ट सिटी असे विकास प्रकल्प मिळाले. यातील मेट्रोच्या कामाला गती मिळाली; मात्र इतर प्रकल्प राज्य आणि केंद्र अशा संघर्षात मागील अडीच वर्षांत मागे पडले. राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना येत्या काळात विकासाबद्दल संवाद वाढून शहरातील प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

महाविकास आघाडी सरकारने २३ गावांचा समावेश पुण्याच्या महापालिका हद्दीत केला आणि पुणे देशातील सर्वाधिक मोठ्या हद्दीची महापालिका बनली. या निर्णयानंतर आजपर्यंत तरी सरकार आणि प्रशासन पातळीवर गावांच्या विकासाचे ठोस धोरण दिसून आलेले नाही. येत्या काळात यापूर्वीच्या ११ आणि आताच्या २३ समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा, रस्ते आणि इतर विकासासाठी नियोजन आराखडा तातडीने मंजूर होऊन पुरेसा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सक्षमीकरण व्हावे लागेल.

पुण्याचे रखडलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, गेल्या अडीच वर्षांत चर्चेतही न आलेली स्टार्टअप योजना, लघु-मध्यम उद्योग, इलेक्ट्रिक व्हेईकल आणि उद्योगक्षेत्र अशा अनेक योजनांना कोविड काळानंतर बूस्टर मिळणं आवश्यक होतं. नवीन सरकारच्या प्राधान्यक्रमात यासर्वांत पुण्याचा विचार होईल, अशी अपेक्षा आहे.

चंद्रकांत पाटलांची जबाबदारी वाढली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे नव्या रचनेत पुण्याचे पालकत्वही येऊ शकते. त्यामुळे पाटील यांच्यावर पुणे शहराचा विकास आणि पक्ष संघटना अशी दुहेरी जबाबदारी वाढेल. शहरातील विकास प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि दिल्लीत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर अधिक असेल. पुण्यातील पक्ष संघटनेवर त्यांची पकड गेल्या अडीच वर्षांत अधिक घट्ट झालेली बघायला मिळाली. गेल्या अडीच वर्षांत अनेकवेळा सरकारवर टीका करत पाटील यांनी पक्षाला बांधून ठेवण्याचं काम स्थानिक पातळीवर केलं. येत्या काळात राजकीय सत्ता हातात आल्यावर संघटनेला अधिक बळ देण्याचंही काम त्यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा आहे. हे करत असताना जुन्या-नव्यांची सांगड घालण्याची कसोटी पाटील यांना करावी लागणार आहे.

महापालिकेत पुन्हा भाजप

महापालिकेच्या निवडणुकांसाठी तीन सदस्य प्रभाग रचना जाहीर झाली. त्याआधीपासून महापालिकेतील विरोधी पक्षाचे तत्कालीन राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरचे अवलंबित्व वारंवार समोर आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपची सध्याच्या संख्याबळाहून पीछेहाट होईल, असे चित्र तयार झाले. महापालिका क्षेत्रात विधानसभेच्या आठपैकी दोन जागांवर २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर थोड्या फरकाने पराभूत झाले. या दोन्ही मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारंवार भाजप संघटनेवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न राज्यातील सत्ताधारी पक्षांनी केला. त्यातून उपनगरातील अनेक नगरसेवकांनी पक्षांतरही निश्चित केले.

राज्यात युतीची सत्ता असताना महापालिकेत २०१७ मध्ये भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले आणि बहुमताने भाजपने पालिकेत सत्ता स्थापन केली. त्यावेळी महापालिकेत चार सदस्यांची प्रभाग रचना भाजपने केली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली. भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले आहेत, अशा प्रभागांत मोठ्या प्रमाणात फेरफार झाली. राज्यातील बदललेली सत्ता गणितं गळती रोखण्यात भाजपला मदत करतीलच. शिवाय भाजपमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघही वाढवतील. शहर विकासाचे धोरण प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठेवला तर भाजपला महापालिका निवडणुकीत बहुमत मिळविण्यापासून रोखणे इतर पक्षांना नक्कीच कठीण असेल.

पुण्याचे रेंगाळलेले प्रकल्प

  • महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो - पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन; पुढचे टप्पे संथ गतीने

  • ‘जायका’ प्रकल्प - रेंगाळून मंजुरी; कामाची गती नाही

  • झोपडपट्टी पुनर्वसन - नियमावलीचा घोळ; पुनर्वसन रखडले

  • पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ - जागा निश्चितीचा घोळ कायम

  • ‘पीएमआरडीए’ रिंगरोड - भूसंपादन; काम सुरू होण्यात दिरंगाई

  • ‘एसएसआरडीसी’ रिंगरोड - सर्वेक्षण पूर्ण; कामाचा पत्ता नाही

  • ‘एचसीएमटीआर’ रस्ता - फेरनियोजन रेंगाळले; काम ठप्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com