
Shiv Jayanti 2023 : लंडनमधील विद्यापीठात शिवजयंती साजरी
मंचर : लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली. त्यासाठी आंबेगाव तालुका, पुणे व सातारा भागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
इंग्लंड, पोर्तुगाल, बांगलादेश व इतर देशांतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला. भगवा ध्वज हातात घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला. लंडन येथील ब्रुनेल विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन निसर्ग पवार, आदित्य ताठे, सौरभ वळसे पाटील व इतर विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीची व कार्याची माहिती इंग्लिश भाषेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची माहिती ऐकून परदेशी विद्यार्थी भारावून गेले होते. सिद्धी कापशीकर या विद्यार्थिनीने मराठीतून पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. आरती, पोवाडा व शिवगीतांसह नृत्याविष्कार सादर केला.