
Shiv Jayanti 2023 : भोरमधून शेकडो शिवज्योती मार्गस्थ
भोर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासकीय जयंतीनिमित्त रविवारी (ता.१९) पहाटेपासून तालुक्यातील रारयेश्वर आणि रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्यावरून शेकडो शिवज्योती मार्गस्थ झाल्या. शिवज्योत घेवून जात असलेल्या शिवप्रेमींकडून करण्यात आलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' च्या जयघोषाने आणि वाद्यांच्या आवाजाने भोरचा परिसर दुमदुमून गेला.
रविवारी पहाटेपासूनच ढोल-ताशांच्या गजरात शिवज्योती निघाल्या. शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी अनवानी पायाने शिवज्योती आपल्या मंडळापर्यंत पोचण्यासाठी धावत होते. शिवज्योतीसोबत दुचाकी, चारचाकी, खासगी बस आणि ट्रममधूनही शिवप्रेमींचा प्रवास सुरु आहे.
ढोल ताशांच्या गजरात आणि पोवाड्यांच्या आवाजात शिवज्योती रसत्यांवरून धावत जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्यावर स्वराज्याची शपथ घेतली असल्यामुळे रायरेश्वरावरून शिवज्योत घेऊन जाणा-या शिवप्रेमींचे संख्या जास्त आहे.
भोर शहरातील चौपाटी परिसरातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ रायरेश्वर व रोहिडेश्वरावरून घेऊन आलेल्या शिवज्योतींचे पूजन केले जात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांना वंदन करून शिवज्योतील आपापल्या गावी मार्गस्थ होत आहेत. नगरपालिलेच्या वतीने शनिवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.
शहरातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याचे शुशोभिकरण करून फुलांची आकर्षक सजावट केली. केवळ भोर तालुक्यातीलच नव्हे तर पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधील शिवमंडळांचे कार्यकर्ते शिवज्योत घेवून गावाकडे निघाले आहेत.