जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - लाठी-काठीची प्रात्यक्षिके... रणवाद्ये, नगारा, सनई-चौघड्यांची सुरावट... खांद्यावर आधुनिक भोई अर्थातच शिवप्रेमींनी घेतलेली शिवरायांची पालखी अन्‌ "जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर... उत्साही कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत चौकाचौकांत पालखीचे केलेले स्वागत... आणि फाल्गुन वद्य पक्षातील तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी तिथीनुसार शहर व उपनगरांमध्ये शिवजयंती मोठ्या दिमाखदार वातावरणात साजरी झाली. 

भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून अखिल भवानी पेठ शिवजयंती उत्सव समिती, महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. रंगावलीकार संजय मोडक यांनी रेखाटलेली रंगावली शिवभक्तांचे आकर्षण ठरली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. नवनिर्वाचित नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील यांनी महाराजांची आरती केली. मंदिर ते रामोशी गेट, संत कबीर चौकातून लक्ष्मी रस्ता मार्गे सोन्या मारुती चौकातून फडके हौद चौक येथून लाल महालापर्यंत मिरवणुकीचा मार्ग होता. शाहीर दादा पासलकर यांच्यासह शिवप्रेमी नागरिक बहुसंख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शहर व उपनगरांतील चौकाचौकांत काल्पनिक शिवमहलासहित शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले होते. हौशी कलाकारांनी नाट्यमय प्रसंगांतून शिवकथांचे सादरीकरण केले. कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रतीकात्मक पद्धतीने सोन्याचा नांगर फिरविण्यात आला. 

भगवे फेटे परिधान करून तरुण-तरुणी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजिला केला होता. पंचक्रोशीतील महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्म साजरा झाला. 

Web Title: shiv jayanti celebration pune