विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आतापर्यंत कॉंग्रेसकडे होते; परंतु भाऊसाहेब भोईर यांच्यासह कॉंग्रेसच्या तब्बल सात नगरसेवकांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेसची सदस्य संख्या घटली. आता दुसरा मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद आपणास मिळावे, यासाठी शिवसेनेच्या सदस्यांचा थयथयाट सुरू आहे. याच आगतिकतेतून शिवसेनेने गुरुवारी महापौरांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. 

कॉंग्रेसचे सभागृहातील संख्याबळ घटले. ही संख्या अगोदर 14 होती. आता ती जेमतेम पाचवर आली आहे. त्यातील आणखी काही जण इतर पक्षांत जाण्याच्या तयारीत आहेत. राजीनामा दिलेल्यांमध्ये विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांचाही समावेश आहे. या राजकीय घडामोडीनंतर सभागृहातील दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. हे जरी खरे असले तरी, येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांसाठी विरोधी पक्षनेत्याची घोषणा नको, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही ती करायची नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेला डिवचले. पक्षाच्या धोरणामुळे महापौर शकुंतला धराडे यांनी अधिकृत विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला मान्यता देण्याचे टाळले. 

त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना सदस्यांना मात्र आउट घटकेसाठी का होईना, प्रमुख विरोधी पक्षाचा मान हवा आहे. तो देण्यास महापौर राजी नसल्यामुळे शिवसेनेने आज महापौरांच्या दालनाबाहेर आंदोलन करून घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हे पद आम्ही आपणास बहाल करत असल्याचे निवेदन शिवसेनेच्या सदस्यांनी महापौरांना सादर केले. 

दरम्यान, एक-दोन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत अधिकृतपणे विरोधी बाकांवर बसण्याचा शिवसेनेचा अट्टहास का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Web Title: Shiv Sena leader for the opposition movement