शिवसेनेची मुसंडी; एमआयएमची एंट्री

शिवसेनेची मुसंडी; एमआयएमची एंट्री

वर्षानुवर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला साथ देणाऱ्या येरवड्यातील मतदारांनी या वेळी मात्र शिवसेनेला भक्कम साथ दिली. त्याचबरोबर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद उल मुसलीमीन (एमआयएम) या पक्षाने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का देत महापालिकेत ‘एंट्री’ केली. राष्ट्रवादी, भाजप, मनसे या पक्षांच्या कमकुवत बाजू लक्षात फायदा घेत शिवसेनेने उमेदवारी देण्यापासून वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने प्रचार करण्यापर्यंतच्या असंख्य गोष्टींमुळे सेनेचे तीन उमेदवार निवडून आणले. मात्र, ‘एमआयएम’ने शिवसेनेला दोन जागांवर कडवी झुंज देत एक जागा पटकाविली. चार हजार मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.

या प्रभागातील अनुसूचित जातीसाठीच्या ‘अ’ गटासाठी भाजपचे वैभव पवार व शिवसेना-रिपब्लिकन जन-शक्तीचे उमेदवार ॲड. अविनाश साळवे यांच्यात लढत होण्याची शक्‍यता होती. मात्र, साळवे यांनी पहिल्या फेरीतच २३१७ मते घेतली. त्याचवेळी ‘एमआयएम’च्या शैलेंद्र भोसले व काँग्रेसच्या संतोष आरडे यांनीही दीड हजार मते मिळवून लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत ॲड. साळवे यांनी जोरदार मताधिक्‍य घेतले. मागासवर्ग महिलांसाठीच्या ‘ब’ गटामध्ये ‘एमआयएम’च्या सायरा शेख यांनी पहिल्याच फेरीत २०८८ मते मिळविली. मात्र, दुसऱ्या फेरीत श्‍वेता चव्हाण यांनी तब्बल ४२३२ मते मिळवीत चांगलीच आघाडी घेतली. पुढच्या दोन फेऱ्यांतही शेख यांनी दोन ते अडीच हजारच्या दरम्यान मते मिळविली. पुढच्या फेऱ्यांत मात्र चव्हाण यांनी हळूहळू शेख यांना मागे टाकले. अखेर ९६५ मतांनी चव्हाण यांनी विजय खेचून आणला. भाजपच्या संध्या देवकर तिसऱ्या स्थानावर राहिल्या. चुरशीची लढत ‘क’ गटात झाली. शिवसेनेच्या तृप्ती शिंदे व काँग्रेसच्या संगीता देवकर यांनी पहिल्या फेरीत दीड ते दोन हजारच्या दरम्यान मते मिळविली. तर ‘एमआयएम’च्या अश्‍विनी लांडगे यांनी २३५३ मते मिळविली. दुसऱ्या फेरीत शिंदे यांनी साडेतीन हजार मतांची आघाडी घेतली, तर लांडगे यांना साडेपाचशे आणि देवकर यांनी चौदाशे मते मिळवून आव्हान कायम ठेवले. तिसऱ्या व चौथ्या फेरीत लांडगे यांनी पाच हजारांच्या दरम्यान मते मिळविली. अखेर साडेसातशेचे मताधिक्‍य घेत लांडगे विजयी ठरल्या. 
खुल्या गटासाठी शिवसेनेचे संजय भोसले, भाजपचे राजेंद्र एंडल, काँग्रेसचे सुनील मलके व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी क्षीरसागर यांच्यात लढत होण्याची शक्‍यता होती. मात्र, एंडल यांना पहिल्या व तिसऱ्या फेरीमध्येच जादा मते मिळाली. तर भोसले यांनी पहिल्या फेरीला २६७८, दुसऱ्या फेरीला ५३५०, चौथ्या फेरीला २५९३ इतकी मते मिळवीत हा सामना एकतर्फी फिरविला. भोसले पावणेआठ हजाराच्या मताधिक्‍याने विजयी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com