Pune: निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ नारायणगाव येथे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

protest against Election Commission decision

Pune: निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ नारायणगाव येथे आंदोलन

नारायणगाव- पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक आयोगाने कायदा धाब्यावर बसवून शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबाण चिन्ह गद्दार गटाला बहाल केले आहे.

पक्षपाती पणाने चुकीचा निर्णय देऊन निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला आहे.अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केला आहे.

शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या

वतीने आज दुपारी येथील बसस्थानक चौकात धिक्कार आंदोलन करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व निवडणूक आयोग यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.

आंदोलन प्रसंगी महिला आघाडीच्या मंदाकिनी दांगट, सरपंच योगेश पाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे,

बाजार समितीचे, माजी उपसभापती दिलीप डुंबरे, शरद चौधरी ,बाबा परदेशी, मंगेश काकडे,जयवंत घोडके आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदाकिनी दांगट म्हणाल्या केंद्र व राज्य सरकार मधील सत्ताधाऱ्यांनी दडपशाही, हुकूमशाही , सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे.

सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर केला जात आहे.या मुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असल्याची भावना निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखविल.

सरपंच पाटे म्हणाले निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेऊन शिवसेनेवर घाला घातला आहे. मोदी सरकारने शिवसेना संघटना मोडकळीस आणली आहे.

या साठी सर्व यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कधीही संपणार नाही .उलट अन्यायामुळे सर्वसामान्य शिवसैनिक पेटून उठला आहे.

याची प्रचिती आगामी निवडणुकीत दिसून येईल.या वेळी शिवसेना नेते दिलीप डुंबरे ,शरद चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून पंतप्रधान , गृहमंत्री व निवडणूक आयोगाचा निषेध केला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी येथे झालेल्या धिक्कार आंदोलन प्रसंगी निषेध करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.