शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' वाढेल : अजित पवार

मिलिंद संगई
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल शिवसेनेसाठी अनुकुल असतील, निकालानंतर शिवसेनी बॅकफुटवर राहणार नाही.

बारामती : जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांनंतर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल, आणि बॅकफूटवर गेलेली शिवसेना पुन्हा आक्रमकपणे पुढे येईल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर शिवसेना टोकाची भूमिका घेऊ शकेल, असे भाकित माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तविले आहे. अर्थात निकाल कसे लागतात या वर सगळीच गणिते अवलंबून असतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अजित पवार यांनी आज पत्नी सौ. सुनेत्रा पवार, मातुःश्री श्रीमती आशाताई पवार व थोरले चिरंजीव पार्थ पवार यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा अंदाज वर्तविला.

'मिनी विधानसभे'चा निकाल राज्यात काय लागतो त्यावरच या सरकारचे भवितव्य अवलंबून असेल, असे ते म्हणाले. शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या तर मधल्या काळात त्यांना बॅकफूटवर जावे लागले होते, आता मात्र जो कमीपणा त्यांना सहन करावा लागला होता, तो दूर होईल आणि ते अधिक मंत्रिपदांसह इतर मोठ्या जागांचीही मागणी करतील. त्या मिळाल्या नाही तर शिवसेना टोकाची भूमिका घेऊ शकेल, अशी शक्यता अजित पवार यांनी आज बोलून दाखविली. 
मधल्या काळात सेनेला नमती भूमिका घ्यायला लागली होती. त्याचा राग ते आता जागा जास्त मिळाल्या तर नक्की काढतील, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.

परिचारकांचे वक्तव्य निंदनीयच
प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीयच होते, त्याचे समर्थन होऊच शकत नाही, सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण काय बोलतो आहोत याचे तारतम्य भाजपला राहिलेले नाही याचेच हे निदर्शक असल्याची टीका अजित पवार यांनी केली. जनतेनेच आता अशा वक्तव्यांचा विचार करायला हवा, अशी भूमिका या पुढील काळात सहन केली जाणार नाही असा इशारा आता जनतेनेच भाजपला द्यायला हवा, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीमय वातावरण...
या निवडणुकीत राष्ट्रवादीला महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर चांगले यश मिळेल, असा अंदाज अजित पवार यांनी व्यक्त केला. आम्ही राज्यात सर्वत्र मतदारांपर्यंत पोचलो आहोत, भाजप सेनेकडून लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Shiv sena will be on frontfoot after elections