शिवरायांच्या शौर्यगाथेचा अनुभव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, ही जगाच्या इतिहासातील श्रेष्ठ दर्जाची लष्करी कारवाई होती. ती कथा कितीही वेळा ऐकली तरी अंगावर काटा उभा राहतो. ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात पुणेकरांना पुन्हा एकदा तो अनुभव मिळाला.

पुणे - शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, ही जगाच्या इतिहासातील श्रेष्ठ दर्जाची लष्करी कारवाई होती. ती कथा कितीही वेळा ऐकली तरी अंगावर काटा उभा राहतो. ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात पुणेकरांना पुन्हा एकदा तो अनुभव मिळाला.

‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात लाल महालातील शौर्यकथा उलगडून दाखवण्यात आली. या वेळी बोलताना इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले, ‘‘सव्वालाख मोगल सैन्याचा रणांगणात पराभव करणे अवघड असल्याने शिवरायांनी गनिमी कावा या तंत्राचा वापर केला. प्रचंड ताकदीच्या शत्रूला चुकवून थेट लाल महालावर छापा टाकायचा व सुखरूपपणे माघारी परतायचे, हे साहस अतुलनीय होते. पुणेकरांना अभिमान वाटणाऱ्या या घटनेचा साक्षीदार असणारा लाल महाल हा राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचे प्रतीक बनला आहे.’’ 

सर्व वारसाप्रेमींनी सूर्या हॉस्पिटल येथील प्राचीन किल्ल्याच्या अवशेषाचीही माहिती घेतली. सुमारे सहाशे वर्षांपूर्वीची तटबंदी व कोकण दरवाजाचा प्रवेश मार्ग सर्वांना दाखविण्यात आला. तसेच, नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचे निवासस्थान व त्यांच्या आवडत्या पिंपळवृक्षास सर्वांनी भेट दिली. गोविंदाग्रज यांनी बरेच लेखन त्या पिंपळवृक्षाकडे बघत केले होते. हा वृक्ष त्यांच्या साहित्याचा एकमेव साक्षीदार असल्याने त्याच्या पानापानांत ‘गोविंद पर्व’ दडले आहे. ते पाहताना सर्व जण भारावून गेले. त्यानंतर पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि केदारेश्‍वराच्या प्राचीन मंदिराचे उपस्थितांनी दर्शन घेतले.

Web Title: Shivaji Maharaj Varsa Darshan