प्रवाशांनो, एसटीसाठी शिवाजीनगरलाच जा कारण....

प्रवाशांनो, एसटीसाठी शिवाजीनगरलाच जा कारण....

पुणे - शिवाजीनगर येथील मेट्रोच्या भूमिगत स्थानकासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्म येथे होणार आहे. मात्र, डेअरी फार्म येथील तात्पुरत्या स्थानकाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने स्थानकाच्या स्थलांतराचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकणार आहे. आता ऑक्‍टोबरअखेर स्थानक नव्या जागेत कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी चिंचवड -स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गावर शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार आहे. तेथून भूमिगत पादचारी मार्गही आकाशवाणीपर्यंत होणार आहे. शिवाजीनगर स्थानकाचे महामेट्रोकडून विकसन होणार आहे. त्यात मेट्रो, रेल्वे, पीएमपी आणि एसटी बससाठी व्यवस्था असेल. त्यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या हबच्या कामासाठी  शिवाजीनगर बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्मच्या पाच एकर जागेवर करण्यात येणार आहे. हे स्थलांतर जूनपर्यंत होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, स्थानकाचे काम वेळेत न झाल्याने स्थलांतराची मुदत वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली होती; परंतु या मुदत वाढीनंतरही डेअरी फार्म येथील पर्यायी स्थानकाच्या शेडचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे १ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या स्थलांतराचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता हे स्थलांतर दिवाळीपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

शिवाजीनगर बस आगाराची जागा -१५ हजार ७०० स्क्वेअर मीटर
मेट्रोच्या भूमिगत स्थानकाला लागणारी जागा - ३ हजार १८५ स्क्वेअर मीटर

वाकडेवाडी येथील डेअरी फार्ममधील तात्पुरत्या बस स्थानकाचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्या कामास विलंब लागला आहे. त्यामुळे १ ऑक्‍टोबर रोजी स्थानकाचे स्थलांतर होणार नाही. दिवाळीपर्यंत स्थानकाचे स्थलांतर होऊ शकेल. 
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे
 

आणखी काही दिवस प्रवाशांना त्रास
एसटी स्थानकाचे स्थलांतर होण्याआधीच स्थानक परिसरामध्ये मेट्रोने कामास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आहे. तसेच या कामामुळे स्थानकामध्ये गाड्यांच्या संचलनातदेखील अडचण निर्माण होत आहे. नुकतेच मेट्रोच्या कामासाठी खोदाई सुरू असताना स्थानकातील केबल तुटली होती, तसेच पाण्याची लाइनदेखील खराब झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानकाच्या स्थलांतरास वेळ लागत असल्याने प्रवाशांना आणखी काही दिवस या समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com