सत्ता गेल्याने राष्ट्रवादीकडून स्वप्नरंजन - खासदार आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

शिक्रापूर - ‘‘अजित पवार मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे परराष्ट्रमंत्री आणि आंबेगावचे आमदार कंदीलमंत्री, अशी स्वप्नातील सत्ता पक्षकार्यकर्त्यांना दाखवत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्रासलेल्या जनतेने या आंदोलनातून नेमके काय घ्यायचे, तेच समजत नाही. सत्ता गेल्याने पिसाटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वप्नरंजन सुरू आहे,’’ अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या शिरूरमधील सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘माझ्यावर टीका करण्यापूर्वी अजित पवारांनी हे सांगावे, की फ्लेक्‍स संस्कृती जिल्ह्यात कोणी आणली. मी लोकांशी गोड बोलणारच आहे, कारण उगाच धरणांची भाषा आमच्या तोंडात कधीच येणार नाही. सुप्रिया सुळे यांच्याबाबत तर काय बोलावे? दिल्लीत मी त्यांचा सहकारी खासदार आहे. त्यांची कारकीर्द आणि त्यांचे लोकसभेतील कर्तृत्वही आम्ही जाणतो. पवारसाहेबांच्या कन्या म्हणून यापूर्वी सहन केले, पण आता त्यांना कोणी फार सहन करणार नाही.’’

‘‘मी पहिल्यांदा खासदार सन २००४ मध्ये झालो आणि बैलगाडा शर्यती सर्व प्रथम बंद झाल्या सन २००५ मध्ये. त्या वेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार होते. तुम्ही सर्वप्रथम बैलगाडा शर्यती का बंद केल्या? हा माझा प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर आता ‘हल्लाबोल’मध्ये द्याच. उगाच भाजप- शिवसेना सरकारच्या नावाने ओरडताना बैलगाडा शर्यती बंद होताना आपले तोंड का बंद ठेवले, तेही सांगा,’’ असेही आव्हान आढळराव पाटील यांनी दिले.

मी माझ्या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांत साडेसात हजार कोटींची कामे आणली. मतदारसंघातील प्रत्येक वाडीवस्तीवर पोचणारा खासदार मी असून, तसे वागणे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनाही पडलेले आहे. याच कर्तृत्वावर मी दोन वेळा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही मिळवला आहे.
 - शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Web Title: shivajirao adhalrao patil politics NCP