लिंगाण्यावर फडकला 30 फुटी भगवा व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

पुण्यातील सखा सह्याद्री परिवाराच्या वतीनं शिवजयंतीचं औचित्य साधून सह्याद्रीतील हा प्रसिध्द असा लिंगाणा सुळका सर केला आहे. 

पुणे - सह्याद्रीच्या द-याखो-यातील सर्वात दुर्गम अशी ओळख असलेल्या लिंगाण्यावर पाऊल ठेवायला सिंहाचं काळीज लागतं. असं म्हणतात. तो अजस्त्र सुळका पाहून भल्या भल्यांची तंतरते. मात्र मराठी मावळ्यांची गोष्ट काही औरच आहे. जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत काही मावळ्यांनी हा सुळका सर केला. त्यावर 30 फुटी भगवा फडकावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला आहे. सध्या सोशल मीडियावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

पुण्यातील सखा सह्याद्री परिवाराच्या वतीनं शिवजयंतीचं औचित्य साधून सह्याद्रीतील हा प्रसिध्द असा लिंगाणा सुळका सर केला आहे. त्यावर स्वराज्याचं निशाण असणारा भगवा फडकावून शिवाजी राजांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली आहे. शिवजयंतीच्या दिवशी याप्रकारची मानवंदना देऊन शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या असा विचार त्या परिवारातील सदस्यांनी केला होता. त्यांच्या त्या मनोदयाला यश आले असून सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

लिंगाणा एक थरार – Shikhar Foundation

सहयाद्रीच्या कुशीत असणा-या गड किल्ल्यांवर चढाई करण्याची अनेक गिर्यारोहकांची इच्छा असते. अनेकजण त्याचा ध्यास घेऊन वेगवेगळ्या गड किल्ल्यांचा ट्रेक करतात. तर काही वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने एकाच दिवसांत तीन ते चार किल्ले सर करत असल्याचे दिसुन आले आहे. दुसरीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अवघड सुळका म्हणजे लिंगाणा. तो त्याच्या सौंदर्याबरोबरच रौद्र रुपासाठीही प्रसिध्द आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर उरात धडकी भरावी असं त्याचं दिसणं आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला कोणी जात नाही. सह्याद्री परिवाराचा मनोदय त्याठिकाणी भगवा फडकावण्याचा वेगळा होता. त्यांनी तो पूर्ण केला.

लिंगाण्यावर जाण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागते. थोडीशी चूक झाली तरी जीवाची किंमत चूकवावी लागते. अशा अवघड लिंगाण्यावर भगवा फडकावून सह्याद्री परिवारानं वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या ध्वज मोहिमेत अनेक अनुभवी ट्रेकर्सला निवडण्यात आले होते.पहिला टप्पा महत्वाचा होता. त्यात लिंगाणाच्या सुळक्यावर ध्वज लावण्यासाठी खड्डा खोदणे, त्यासाठी पहार, फावडे घेऊन सहा मावळ्यांनी खड्डा खोदण्याचे काम केले. त्यानंतर पुढच्या आठवड्यात तिथे जाऊन ध्वज खांब बसविण्यासाठी तयारी करण्यात आली. अंतिम टप्पा होता तीस फुटी खांब रायलिंग पठारावरुन लिंगाणा सुळक्यावर पोहोचविण्याचा. सुरुवातीला  रायलिंग पठार ते लिंगाणा सुळका असा दोर बांधला गेला. त्या दोराला कप्पीच्या मदतीनं खांब बांधून तो लिंगाण्यावर असलेल्या टीमनं वरच्या टप्प्यापर्यत पोहोचवला.

या ध्वज मोहिमेचे नेतृत्व सखा सह्याद्रीचे सतीश हरगुडे यांनी केले. मोहिमेत 25 जणांनी सहभाग घेतला होता. मोहिमेसाठी मोहरी गावचे सरपंच पोटे यांनी मोलाचे सहकार्य केले. 64 वर्षीय गिर्यारोहक दिलीप उंद्रे यांचा या मोहिमेतील सक्रिय सहभात सर्वांसाठी कौतूकाचा विषय ठरला.

पुणे विद्यापीठाच्या बैठकीत ABVPचा खोडा; परीक्षा फीवर विद्यापीठ गप्प​

मोहिमेत सहभागी झालेले गिर्यारोहक - सतीश हरगुडे, नवनाथ सातव, दिलीप उंद्रे, सतीश सावंत, स्वप्निल उंद्रे, प्रवीण उंद्रे, विवेक पवळे, अमोल नेवाळे, योगिता नेवाळे, प्रियांका हरगुडे, रोहन पवार, अश्विनी काळभोर, विलास कुमकले, अक्षय वाघमारे, ओम भोसले, गौरव भोकरे, सनी परदेशी, किरण शेलार, करण शेलार, सोहेल शेख, विवेक जगताप, शहाजी जाधव, अनिकेत भोसले, उमेश बोरखाडे, यश भोसले, मयुर कडू आणि ऋषिकेश बोरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivjayanti occasion Sakha Sahyadri pariwar flaunt saffrony flag on lingana