लाल महालात ‘शिवमहोत्सव २०२०’चे दिमाखात उद्‌घाटन

शिवाजी रस्ता - अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे आयोजित "शिवमहोत्सव 2020'चे उद्‌घाटन मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना (डावीकडून) विकास पासलकर, मोहोळ, दीपक मानकर आदी.
शिवाजी रस्ता - अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे आयोजित "शिवमहोत्सव 2020'चे उद्‌घाटन मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना (डावीकडून) विकास पासलकर, मोहोळ, दीपक मानकर आदी.

पुणे - अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे आयोजित ‘शिवमहोत्सव २०२०’चे लाल महालात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी दिमाखात उद्‌घाटन झाले. शहरात शिवसृष्टी साकारावी, यासाठी एकत्रितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

शिवमहोत्सवाच्या निमित्ताने लाल महालात अभिजित धोत्रे यांनी जतन व संवर्धन केलेल्या शिवकालीन शस्त्रांचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सविता गोरे यांनी तयार केलेल्या बाहुल्यांचा आणि विविध किल्ल्यांच्या छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. सोमवारपर्यंत (ता. १७) सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान ते सर्वांसाठी खुले आहे. महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी महापौर मोहोळ, माजी उपमहापौर दीपक मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के, धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम, दत्ता सागरे, डॉ. सुनीता मोरे आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी मानकर म्हणाले, ‘‘शहरात शिवसृष्टीसाठी बीडीपीमधील ५० एकर जागा देण्याचे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; परंतु त्याची पूर्तता झाली नाही. आता त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नुकतेच याबाबत पत्र दिले असून, सर्वांनी एकत्रितपणे त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.’’ 

प्रास्ताविकात महोत्सवाचे संयोजक विकास पासलकर यांनी महोत्सव लाल महालात आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला आणि शिवसृष्टीसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, या महोत्सवाच्या माध्यमातून ‘शिवराय मनामनांत, शिवजयंती घराघरांत’ हा संदेश राज्यात घराघरांत पोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर कैलास वडघुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com