आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीही आता ‘शिवनेरी’ची सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना आता खासगी वाहनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याची गरज राहणार नाही. कारण, आता एसटी महामंडळाने त्यांचा प्रश्‍न सोडविण्याचे ठरविले आहे.

पुणे - परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना आता खासगी वाहनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याची गरज राहणार नाही. कारण, आता एसटी महामंडळाने त्यांचा प्रश्‍न सोडविण्याचे ठरविले आहे. आता पुणे स्टेशनवरून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवनेरी बससेवा लवकरच सुरू होणार असून, त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात पोचले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एसटी महामंडळाने गेल्याच महिन्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज देशांतर्गत विमानतळासाठी स्वारगेट एसटी स्थानकावरून बससेवा सुरू केली आहे. बोरिवली मार्गावरील बस विमानतळावरही सोडण्यास आता  सुरुवात झाली आहे. स्वारगेटवरून सुमारे दर एक तासाला सुटणाऱ्या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यासाठी दर तासाला वातानुकूलित बस सोडण्यात येत आहे. थेट विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ बसमधून उतरता येत असल्यामुळे प्रवाशांना ही बससेवा सोयीची ठरत आहे. पुण्याहून विमानतळावर जाण्यासाठी पहाटे पाच वाजता पहिली, तर रात्री अकरा वाजता शेवटची बस आहे. तर, विमानतळावरून पहाटे पाच वाजता पहिली आणि रात्री पावणेदहा वाजता शेवटची बस पुण्यासाठी असेल. या मार्गावरील बस सुमारे सव्वातीन तासांत प्रवास पूर्ण करते, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

Image

आता सेवा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी
देशांतर्गत विमानतळासाठीची बससेवा यशस्वी ठरल्यामुळे एसटी महामंडळाने आता आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बससेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. शहरातून पुणे स्थानकावरून ही बस सुटणार आहे. ही बस थेट विमानतळाच्या आवारात पोचणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या बॅगा घेऊनही या बसमधून प्रवास करता येईल. तसेच, विमानतळावरूनही प्रवाशांना या ‘एसी’ बसद्वारे पुण्यात येणे शक्‍य होणार आहे. या बससेवेसाठी पुणे-मुंबई मार्गावरील बसचे नेहमीचेच प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे. पुण्याहून खासगी वाहनांद्वारे मुंबईतील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन याबाबतचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी थेट बससेवेची प्रवाशांची मागणी होती. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाशी याबाबत बोलणी झाली आहेत. बससाठी त्यांनी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या मार्गावरही प्रवाशांसाठी लवकरच एसी बससेवा सुरू होईल. 
यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivneri facility for international airport