ढोलताशांच्या निनादात उभारली स्वराज्यगुढी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - जय भवानी जय शिवाजीच्या घोषात आणि ढोलताशांच्या निनादामध्ये सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर शनिवारवाड्याच्या प्रांगणात 51 फूट उंचीची स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची एका सुरात आरतीदेखील म्हणण्यात आली. 

पुणे - जय भवानी जय शिवाजीच्या घोषात आणि ढोलताशांच्या निनादामध्ये सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर शनिवारवाड्याच्या प्रांगणात 51 फूट उंचीची स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची एका सुरात आरतीदेखील म्हणण्यात आली. 

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. महापौर मुक्ता टिळक, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अमित गायकवाड, सुनील मारणे उपस्थित होते. शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी स्वराज्यगुढी सजविण्यात आली होती. फर्जंद या चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. 

टिळक म्हणाल्या, ""रायगड व पुण्यासह संपूर्ण देशभर शिवराज्याभिषेक दिन उत्साहाने साजरा होत आहे म्हणूनच हा दिवस "स्वराज्य दिन' म्हणून सर्वत्र साजरा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.'' 

गायकवाड म्हणाले, ""शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले. म्हणूनच सहा जून हा दिवस शासनाने स्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा.'' 

शिवगर्जना, नादब्रह्म ट्रस्ट, नूमवि, जय शिवराय, सह्याद्रीगर्जना, रुद्रगर्जना, शिवनेरी या ढोलताशा पथकांनी वादनात सहभाग घेतला. 

समितीचे समन्वयक अनिल पवार, शांताराम इंगवले यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये स्वराज्यध्वजासह स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला.

Web Title: shivrajyabhishek day celebration