शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलेले औक्षण... आणि स्वराज्य गुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती...अशा शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीने ५१ फुटी स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलेले औक्षण... आणि स्वराज्य गुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती...अशा शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीने ५१ फुटी स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवजयंती महोत्सव समितीने ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, राजाभाऊ ढमढेरे,  स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधींसह नागरिक उपस्थित होते. शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील सर्व स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींच्या हस्ते श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्य गुढी दिमाखात उभारण्यात आली. 

गायकवाड म्हणाले, की श्री शिवछत्रपतींनी सहा जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाच्या गौरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले. सहा जून हा दिवस राज्य सरकारने स्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा. शिवराज्याभिषेक मनामनात आणि घराघरांत ही संकल्पना समितीतर्फे राबविण्याचे आवाहनही केले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला.  

सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष असून, गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती महिलांच्या हस्ते झाली. समितीचे समन्वयक अनिल पवार, शांताराम इंगवले यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा परिषदेने मुख्य सदनासोबतच पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये स्वराज्य ध्वजासह स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. 

याशिवाय संघटनांमार्फत दुर्गदुर्गेश्वर रायगड, लाल महाल, संभाजी महाराज पुतळा डेक्कन, चंद्रमौलेश्वर मंदिर हडपसर, वारजे चौक, नळस्टॉप चौक, १५ ऑगस्ट चौक, शिवणे गाव, नांदेड गाव, वीर बाजी पासलकर भवन, खेड-शिवापूर येथेही स्वराज्यगुढी उभारण्यात आली. सचिन पायगुडे, किरण देसाई, महेश मालुसरे, रवींद्र कंक, गोपी पवार, समीर जाधवराव, दिग्विजय जेधे, नीलेश जेधे, मंदार मते, शंकर कडू, मयूरेश दळवी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivrajyabhishek sohala celebration