युतीचे घोडे अडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

जागावाटपाबाबत एकमत नाही; दोन दिवसांत पुन्हा बैठक

पुणे - महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाने आखली असली तरी, भाजप-शिवसेना यांच्या ‘युती’ची चर्चा फिसकटत असल्याचे दिसून येत आहे. जागावाटप आणि दोन्ही पक्षांच्या धोरणांबाबत एकमत होत नसल्यानेच ‘युती’त आडकाठी येत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात शनिवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता पुन्हा दोन दिवसांत बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला. 

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यातच शिवसेनेशी युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या या दोन्ही पक्षांमध्ये आता युती करण्याच्या दृष्टीने हालचाली होत आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या बैठका होत आहेत. गेल्या आठवडाभरात तीन बैठका होऊनही जागावाटपासंदर्भात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने भाजप-शिवसेनेतील इच्छुक हवालदिल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु तीत कोणताही निर्णय झालेला नाही. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार चर्चेचा सोपस्कार पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. 

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येत आहे. एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात येत आहेत. त्यानुसार चर्चा पुढे जात आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत त्याच मुद्‌द्‌यांवर चर्चा झाली असून, ती सकारात्मक आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक होईल.’’

शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण म्हणाले, ‘‘विरोधकांना सत्तेपासून रोखण्यासाठी आमच्या पातळीवर सर्व प्रयत्न सुरू आहेत. मात्र, युतीबाबत समाधानकारक निर्णय झाले पाहिजे. तशी बोलणी करण्यात येत आहे.’’

चर्चेचा केवळ सोपस्कार
महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असली तरी, चर्चेचा केवळ सोपस्कार पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. युतीचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील चर्चा ही नावापुरतीच राहणार असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: shivsena bjp alliance problem in municipal election