निवडणुकीत बापटांची मस्ती उतरवू- शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पिंपरी- चिंचवड महापालिकेत शिवसेनेबरोबर युती हवी आणि पुणे महापालिकेत नको, अशी त्यांची भूमिका आहे. संसदीय कामकाजमंत्री असणारे बापट यांना राजशिष्टाचार माहिती नाही का? ही चूक नाही, तर माझे नाव जाणीवपूर्वक टाळले गेले.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पूर्णपणे डावलले गेलेले शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर तोफ डागली आहे. राजशिष्टाचार न पाळणारे बापट यांची आगामी महापालिका निवडणुकीत मस्ती उतरवू, अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांशी बोलताना संताप व्यक्त केला आहे.

मेट्रो भूमिपूजन समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवतारे यांचे नाव नव्हते, त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले गेले नाही. हे सर्व बापट यांनीच केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला. ते म्हणाले, "माझ्या मतदारसंघातील तीन प्रभाग महापालिकेत आहेत.

महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत माझे नाव असते. पण, बापट यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. मी या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी संबंधित कार्यालयांतून आमचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले गेले. पालकमंत्र्यांना माझ्या नावाचे काय वावडे होते हेच कळत नाही, केवळ त्यांचे पितळ उघडे होईल ही भीती त्यांना असावी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्याबरोबर चांगले काम आम्ही करीत आहोत. मात्र या संदर्भात मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे. स्थानिक पातळीवर भाजपचे पालकमंत्री आणि आमदार उर्मटपणे वागत आहेत.''

"पिंपरी- चिंचवड महापालिकेत शिवसेनेबरोबर युती हवी आणि पुणे महापालिकेत नको, अशी त्यांची भूमिका आहे. संसदीय कामकाजमंत्री असणारे बापट यांना राजशिष्टाचार माहिती नाही का? ही चूक नाही, तर माझे नाव जाणीवपूर्वक टाळले गेले. मी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहे. पुढील काळात पुण्याच्या राजकारणात सक्रिय होणार असून, शिवसैनिकांना पूर्ण ताकद देणार आहे. आगामी महापालिकेत त्यांची मस्ती उतरवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: shivsena leader vijay shivtare statement against girish bapat