"तुम्ही मिस्टर कुल आहात तर मी मिस्टर हॉट, सोडणार नाही"; राऊतांचा राहुल कुल यांना इशारा : Sanjay Raut Vs Rahul Kul | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut_Rahul Kul

Sanjay Raut Vs Rahul Kul: "तुम्ही मिस्टर कुल आहात तर मी मिस्टर हॉट, सोडणार नाही"; राऊतांचा राहुल कुल यांना इशारा

दौंड : "तुम्ही मिस्टर कुल आहात तर मी मिस्टर हॉट आहे, सोडणार नाही" अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांना गंभीर इशारा दिला आहे. कुल यांच्या कथित भीमा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊतांनी दौंड इथं पोलखोल सभा घेतली, यावेळी ते बोलत होते. (Shivsena Sanjay Raut rally at Dund regarding Bhima sugar mill gives warning to MLA Rahul Kul)

राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून सगळे लोक कसब्यात धंगेकरांचा पराभव करण्यासाठी आले. मोदी फक्त भ्रष्ट्राचारांच्या प्रचाराला जातात. जो भ्रष्टाचार करत नाही त्याला भाजपत स्थानच नाही. यांचे भ्रष्टाचार लहान नाहीत कोट्यवधींचे आहेत. पण मी रमेश आप्पा थोरात, बापू ताकवणे आणि अॅड. महामुनी यांचा आभारी आहे. कारण त्यांनी माझ्यासमोर राज्यातील सहकार क्षेत्रातील भ्रष्टाराचाचं सर्वात मोठं प्रकरण आणलं आहे. अनेक दिवसांपासून त्यांनी हे प्रकरण मला सांगितलं, पण मी तुरुंगात असल्यानं यासाठी मला वेळ मिळाला नाही"

कोण वाचवतं ते पाहतोच, ५०० कोटी पचू देणार नाही - राऊत

आमदार राहुल कुल यांच्याशी माझं व्यक्तीगत भांडण नाही. त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर स्वतः रमेश अप्पा यांनी त्यांना या कारखान्याचं चेअरमन केलं. तुम्ही या संधीचं सोन करायला हवं होतं, पण तुम्ही या कारखान्याची माती केलीत आणि ५० हजार शेतकरी सभासदांवर अन्याय, अत्याचार केला. या सभासदांनी दौंड पोलीस ठाण्यात ५० हजार गुन्हे दाखल करावेत.

गेल्या दोन महिन्यांपासून राहुल कुल यांच्या भ्रष्टचारासंबंधी मी गृहमंत्रालयाकडं वेळ मागतोय पण मिळत नव्हती. गृहमंत्रालयानं माझ्या तक्रारीची दखल घेतली नसल्यानं शेवटी मी सीबीआयकडं तक्रार दाखल केली, आता सीबीआय काय करतं बघू? त्यानंतर मी ईडीकडं तक्रार दाखल करेन त्यानंतर हायकोर्टात जाईन.

२०२४ ला आपलं सरकार येणारच आहे केंद्रात आणि राज्यातही, तुम्हाला कोण वाचवत तेच पाहतो मी. आम्हाला तुरुंगात टाकता काय? पाचशे कोटी तुम्हाला पचू देणार नाही, हे मनी लॉँडरिंग आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी कुल यांच्यावर हल्लाबोल केला.

पुढच्यावेळी किरीट सोमय्या यांना मी इथं आणणार आहे, नाही आले तर कॉलर पकडून आणेन. आप मिस्टर कूल हो तो मै मिस्टर हॉट हूँ, छोडुंगा नाही, अशा शब्दांत राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे.