शिवसेनेकडून स्वबळाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत भाजपबरोबरच युती करण्यासंदर्भात एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र स्वबळाची तयारी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पक्षाने मंगळवारपासून प्रभागातील इच्छुकांच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. आज पहिल्या दिवशी हडपसर आणि वडगाव शेरी या दोन्ही मतदारसंघात येणाऱ्या प्रभागातील इच्छुकांचा आढावा घेण्यात आला.

पुणे - महापालिका निवडणुकीत भाजपबरोबरच युती करण्यासंदर्भात एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र स्वबळाची तयारी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पक्षाने मंगळवारपासून प्रभागातील इच्छुकांच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. आज पहिल्या दिवशी हडपसर आणि वडगाव शेरी या दोन्ही मतदारसंघात येणाऱ्या प्रभागातील इच्छुकांचा आढावा घेण्यात आला.

युती करण्यासंदर्भात कालच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली. त्यात प्राथमिक स्तरावर युतीसंदर्भात चर्चा झाली. चर्चा सकारात्मक असल्याचे भासवले जात असले तरी, प्रत्यक्षात पक्षाला अपेक्षित असलेल्या जागा भाजपकडून मिळण्याची शक्‍यता दिसत नसल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे युती होणार म्हणून पक्षातील इच्छुक धास्तावले आहेत, तर अन्य पक्षांतून सेनेत येऊ पाहणाऱ्यांनीही ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीचा अनुभव आणि या सर्व पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने युतीची चर्चा सुरू ठेवतानाच दुसरीकडे स्वबळावर निवडणुकांची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रभागाचा आढावा बैठक घेण्यास सुरवात केली आहे.

शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगाव शेरी आणि हडपसर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागातील इच्छुक, यादीप्रमुख यांच्या बैठका घेण्यात आल्या. मतदार याद्यांची छाननी, प्रचार कसा करावा, प्रचारात काय मुद्दे मांडावेत, अन्य पक्षांकडून कोण इच्छुक उमेदवार आहेत, एकूणच प्रभागात लढत कशी राहील, काय काळजी घ्यावी, अर्ज कसा भरावा आदी गोष्टींची माहिती या वेळी इच्छुकांना देण्यात आली. अशाच प्रकारे अन्य मतदार संघ प्रभागांतील इच्छुकांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवसेनेला ५० जागा? 
युती करण्यासाठी शिवसेनेने ६५-७० जागांची मागणी भाजपकडे केल्याचे समजते. मात्र, गेल्या महापालिका निवडणुकीची परिस्थिती आणि सद्यःस्थितीत मोठा बदल झाला आहे. भाजपची ताकद शहरात वाढली आहे. मात्र, युती करावी लागेल, असे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५-६ जागा शिवसेनेस सोडण्याची काही आमदारांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला जास्तीत जास्त ५० जागा देता येतील, असा सूर भाजपमधून उमटत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: shivsena self preparation in municipal election