दहाच्या नाण्याबाबत तक्रार देणाऱ्यालाच पोलिसांची दमबाजी 

रवींद्र जगधने 
शनिवार, 31 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : भारतीय चलन नाकारल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा भारतीय रिजर्व्ह बँकेच्या सूचना असताना, दहाचे नाणे नाकारणाऱ्या दुकानदाराविरोधात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकालाच पोलिसांनी दमबाजी करीत शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (ता. 29) दुपारी येथील गांधीनगरमध्ये घडली. 

पिंपरी (पुणे) : भारतीय चलन नाकारल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा भारतीय रिजर्व्ह बँकेच्या सूचना असताना, दहाचे नाणे नाकारणाऱ्या दुकानदाराविरोधात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकालाच पोलिसांनी दमबाजी करीत शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (ता. 29) दुपारी येथील गांधीनगरमध्ये घडली. 

लाखन केवल रावळकर (वय 38, रा. गांधीनगर, खराळवाडी, पिंपरी) असे तक्रारदाराचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, लाखन यांच्या पत्नी गांधीनगरमधील तांदूळ आणण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात गेल्या होत्या. त्या वेळी चारही दुकानदारांनी त्यांच्याकडील दहाची नाणी स्वीकारण्यास नकार दिला. चौधरी नावाच्या दुकानदाराने तर नाणी झटकून दिले आणि तेथून जाण्यास सांगितले. याबाबत लाखन यांनी दुकानदाराला नाणे नाकारण्याबाबत जाब विचारला असता, "सरकारने हे नाणे बंद केले आहे,' असे उत्तर दुकानदाराने दिले. मात्र, "नाणे न घेतल्यास तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते,' असे लाखन यांनी सांगताच दुकानदाराचा पारा चढला. "कोणाला घेऊन यायचे त्याला आणा' म्हणत त्यांना तेथून हुसकावून लावले. 

त्यानंतर लाखन यांनी हेल्पलाइन नंबर शंभरावर फोन केला असता पोलिस कर्मचारी देवेंद्र कन्हेरे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दुकानदाराला कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता "दहाचे नाणे चालत नाही, तर तू कशाला देतो' असे म्हणत लाखन यांनाच कन्हेरे यांनी शिवीगाळ केली. त्या वेळी नाणे चालू असल्याबाबत सांगताच "तुलाच आत टाकील' अशी दमबाजी केल्याचे लाखन यांनी सांगितले. 

अदखलपात्र गुन्हा दाखल 
याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवे, विष्णू सरपते, ऍड. अतुल कांबळे यांच्या पुढाकाराने संत तुकारामनगर पोलिस चौकीत मनोज प्रोव्हिजनचे गोविंद चौधरी, सुरेश चौधरी व एका चौधरी नावाच्या दुकानदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. 

कायदा काय सांगतो
भारतीय चलन न स्वीकारल्यास संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 124 "अ' नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहाचे नाणे नाकारणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, याबाबत पोलिसांना सांगितले असता, पोलिसांनी मलाच शिवीगाळ करत दमबाजी केली. मी रिक्षा चालक असून सर्वांकडून दहाची नाणी स्वीकारतो. 
- लाखन रावळकर, तक्रारदार 

भारतीय नाणे नाकारल्याबद्दल आत्तापर्यंत कोठे गुन्हा दाखल झाल्याचे ऐकले नाही. मात्र, आरबीआयचे नियम व याबाबत असलेल्या कायद्यांची तज्ञांकडून माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
- श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी पोलिस ठाणे 

Web Title: shopkeeper ten rupees coin police crime