सत्य बोलण्याचे धैर्य दाखवावे - डॉ. देवी

आगाखान पॅलेस - कस्तुरबा गांधी यांच्या समाधीला अभिवादन करताना डॉ. गणेश देवी यांच्यासह विविध देशांतील लेखक.
आगाखान पॅलेस - कस्तुरबा गांधी यांच्या समाधीला अभिवादन करताना डॉ. गणेश देवी यांच्यासह विविध देशांतील लेखक.

पुणे - लोकांच्या बाजूने बोलणारेच देशाचे शत्रू वाटू लागले आहेत. सत्य लिहिणारे पत्रकार, लेखक यांना लक्ष्य केले जात आहे. ही जगभरातील स्थिती आहे. त्यामुळे सत्य बोलण्याचे धैर्य लेखकांना दाखवावे लागेल, असे प्रतिपादन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले. 

पुण्यात ८४व्या पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. विमाननगर येथील सिंबायोसिस संस्थेच्या सभागृहात त्यास प्रारंभ झाला. त्या वेळी डॉ. देवी बोलत होते. पेन इंटरनॅशनलच्या अध्यक्षा जेनिफर क्‍लेमेंट, सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार व्यासपीठावर उपस्थित होते. सुमारे ८० देशांचे प्रतिनिधी या संमेलनासाठी आले आहेत. लोकशाही मूल्यांसाठी झटणारे कर्नाटकमधील व्यंग्यचित्रकार पी. महमूद यांना या वेळी ‘पेन गौरी लंकेश पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. 

डॉ. देवी यांनी त्यांच्या भाषणात जगभरातील सरकारी धोरणांवर भाष्य केले. तुमचे अस्तित्व ही आता तुमची ओळख राहिली नाही, तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल पुरावा (आधार) आवश्‍यक बनला आहे. ‘फिजिकल टू डिजिटल’ असे हे संक्रमण सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. केवळ एका देशात नव्हे; तर जगातील अनेक देशांत ही परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार, लेखकांवर हल्ले होत आहेत. त्याचे कारण हिंसक समाज तयार होत आहे. अतिलोभ असलेली व्यवस्था निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे, असेही ते म्हणाले.

अभिनव उद्‌घाटन
पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे उद्‌घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले. आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांचा अस्थीस्तंभ आणि कस्तुरबा गांधी यांच्या समाधी स्तंभाला जगभरातून आलेल्या साहित्यिकांनी फुले अर्पण केली. त्यानंतर शांती प्रार्थना करून या अधिवेशनाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

पेन इंटरनॅशनल काँग्रेस जगातील लेखकांची संघटना आहे. त्यांचे संमेलन भारतात प्रथमच होत आहे. आपल्या मराठी भाषेला जगाच्या अग्रस्थानी नेण्याचा हा क्षण आहे. तो वाया घालवू नये.
- डॉ. गणेश देवी, संयोजक, पेन इंटरनॅशनल, पुणे

मी मेक्‍सिकोची आहे. तेथील साहित्यिक ऑक्‍टोव्हिओ पाझ यांचे बरेच साहित्य भारतासंबंधी आहे. पेन इंटरनॅशनलचे संमेलन भारतात व्हावे, ही इच्छा होतीच. या निमित्ताने ती पूर्ण झाली.  
- जेनिफर क्‍लेमेंट, अध्यक्ष, पेन इंटरनॅशनल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com