कारवाईचा नुसताच  "फार्स' 

- संदीप जगदाळे  ----------- 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे ः महापालिकेने आठ दिवसांपूर्वी सोलापूर रस्त्यावरील फेरावाल्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली, परंतु अतिक्रमण कारवाई थंडावल्याने पुन्हा हा रस्ता फेरीवाल्यांनी व हातगाडीवाल्यांनी व्यापला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. अतिक्रमण कारवाई नियमितपणे व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

पुणे ः महापालिकेने आठ दिवसांपूर्वी सोलापूर रस्त्यावरील फेरावाल्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली, परंतु अतिक्रमण कारवाई थंडावल्याने पुन्हा हा रस्ता फेरीवाल्यांनी व हातगाडीवाल्यांनी व्यापला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. अतिक्रमण कारवाई नियमितपणे व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

हडपसर-मुंढवा सहायक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत बोकाळलेल्या हातगाड्या आणि स्टॉलच्या अतिक्रमणांमुळे जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, लाखो रुपये खर्च करून तयार केलेले पदपथही वाया गेल्यात जमा आहेत. संबंधित व्यावसायिकांचे अधिकाऱ्यांशी असलेले साटेलोटे, व्यावसायिकांकडून निर्माण होत असलेली अनारोग्याची परिस्थिती, व्यावसायिकांची दादागिरी आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास, असे अनेक प्रकार उघडपणे दिसत असले, तरी प्रशासन मात्र ढिम्मच आहे. 

ज्या भागात खाद्यपदार्थांच्या या गाड्या वा स्टॉल सुरू आहेत, तेथील स्थानिक रहिवाशांना या व्यावसायिकांचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे व्यवसाय बेकायदा चालत असल्यामुळे त्यातील कोणालाही महापालिकेचा अधिकृत नळजोड मिळालेला नसतो. त्यामुळे जवळच्या कोणत्याही ठिकाणावरून पाणी आणून हे व्यवसाय चालवले जातात. पाणी साठवण्यासाठी अतिशय घाणेरड्या बादल्या वापरल्या जातात. तसेच रिकाम्या थाळ्या, चमचे, कप, ग्लास, अन्य भांडी धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो. तेच-तेच पाणी पुन्हा-पुन्हा वापरले जाते. एकाच बादलीत भांडी धुतली जातात. सर्व गाड्यांवरचे पदार्थ हे उघड्यावरच तयार केले जातात आणि ते उघड्यावर मांडून तसेच विकले जातात. 

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर प्रमाणपत्रधारक फेरीवाल्यांपेक्षा नव्याने अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्यावर महापालिकेचा अंकुश नाही. त्यामुळे हद्दीतील सर्वच रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. 
 

""जोपर्यंत प्रमाणपत्रधारक फेरीवाल्यांचे शंभर टक्के पुनर्वसन पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्वरित कारवाई थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल'' 
- मोहन चिंचकर, अध्यक्ष, पथारी व्यावसायिक पंचायत समिती, हडपसर विभाग 

""प्रमाणपत्रधारक फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची प्रकिया सुरू असूनच लवकर त्यांचे पुनर्वसन केले जाईल. तसेच अतिक्रमण कारवाई सातत्याने करण्यात येणार असून, अनधिकृत फेरीवाल्यांची कोणतीही गय केली जाणार नाही.'' 
- माधव जगताप, उपआयुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका 

तळीरामांकडून गाड्यांचा वापर 
-------------------- 
चायनीज आणि अंडाभुर्जी विकणाऱ्या गाड्या सायंकाळनंतर लावल्या जातात. या गाड्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या गाड्यांचा उपयोग अनेक गुंड, मवाली यांच्याकडून मद्य पिण्यासाठी केला जातो. या गाड्यांच्या आजूबाजूला अनेक टोळकी रात्री मद्य पीत बसलेली असतात. त्याचा त्रास परिसरातील रहिवाशांनाही होतो. अनेक गाड्या अशा पद्धतीने लावल्या जातात, की पार्किंगची जागाही बंद केली जाते. काही गाड्या घरे वा बंगल्यांच्या सीमाभिंतींचा आधार घेऊन लावल्या जातात. या गाड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही होत असते. 
---------------------------------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show off the encroachment action