मतदान यंत्र 'हॅक' करून दाखवाच !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

ईव्हीएमची तांत्रिक वैशिष्ट्ये 
* या यंत्रात तांत्रिकदृष्ट्या 8 प्रकारची सुरक्षा तपासणी 
* यंत्रातील "चीप'मध्ये छेडछाड करता येत नाही 
* यंत्राच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअरची सतत देखभाल 
* मतदानानंतरच्या दुसऱ्या क्षणात पोहोच मिळत असल्याने पारदर्शकता कायम 
* निवडणूक आयोगाच्या "हॅकेथॉन'मध्येही यंत्राच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब 

पुणे - ""भारतात निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) कुठल्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही. त्यामध्ये अद्ययावत व अतिउच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले आहे. तरीही आम आदमी पक्ष किंवा अन्य राजकीय पक्ष "ईव्हीएम'वर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. "आप'ने 90 सेकंद नव्हे, तर "अनलिमिटेड टाइम' घ्यावा आणि "ईव्हीएम'ला "हॅक' करून दाखवावे, असे थेट आव्हान, "ईव्हीएम' उत्पादकाने मंगळवारी दिले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 90 सेकंदात "ईव्हीएम' मशिन "हॅक' केल्याचा दावा, केला होता. या पार्श्‍वभूमीवर "ईव्हीएम' मशिनचे उत्पादन करणाऱ्या "सिग्नल सर्किट'चे संस्थापक अजित गावडे यांनी ईव्हीएम संदर्भात माहिती देण्यासाठी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी ईव्हीएमविषयी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांची गावडे यांनी प्रात्यक्षिकासह उत्तरे देत "सकाळ फेसबुक लाइव्ह'वर नेटिझन्सच्याही शंकांची उत्तरे दिली. मुळात या यंत्राचा इंटरनेटशी संबंधच येत नाही. त्यात जीपीएसही नाही. ईव्हीएम हे ऑनलाइन प्रणालीशी जोडले गेलेले नसल्यामुळे "हॅक' करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

काही राजकीय पक्षांनी "ईव्हीएम'वर उपस्थित केलेल्या प्रश्‍नचिन्हामुळे सामान्य मतदारांच्या मनावर परिणाम होतो. मतदारांत "ईव्हीएम'विषयी गैरसमज पसरू नये, यासाठी आम्ही जनजागृती करत असल्याचे गावडे यांनी नमूद केले. ते म्हणाले, ""भारतासारख्या मोठ्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही निःपक्षपाती व तितकीच पारदर्शक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या निवडणूक प्रक्रियेची गांभीर्याने दखल घेतली जाते. परंतु यापूर्वीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने "ईव्हीएम'वर आक्षेप नोंदविले होते. तर आता आप, कॉंग्रेस व अन्य पक्ष स्वतःच्या अपयशाचे खापर "ईव्हीएम'वर फोडत आहेत. मुळात "ईव्हीएम' हे यंत्र असून, त्यामध्ये बसविलेल्या "चीप'मधील सूचनांनुसारच ते आपले कार्य करते. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ही यंत्रे जगातील सर्वांत चांगली यंत्रे म्हणून ओळखली जातात. तरीही या यंत्रांच्या वापराबाबत आक्षेप घेणे, चुकीचे आहे.'' 

गावडे म्हणाले, ""आप'ने हे यंत्र "हॅक' करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. मात्र ते यंत्र बाजारू व नकली आहे. घरी बनविलेले यंत्र त्यांनी हॅक करून दाखविले आहे. मुळात निवडणुकीपूर्वी या यंत्राशी छेडछाड करणे, त्यामध्ये नवीन प्रोग्रॅम टाकणे किंवा अन्य तांत्रिक बिघाड करणे कोणालाही शक्‍य नाही. कारण त्यामध्ये वापरली जाणारी "चीप' ही अद्ययावत तंत्रज्ञानाने बनविलेली असते. त्यामुळे ही चीप बदलता येत नाही. त्यातही यंत्राशी छेडछाडीचा प्रयत्न झाल्यास ते तत्काळ बंद होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या यंत्राचे तुम्ही काहीही बिघडवू शकत नाहीत. दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया. इथे तर कडेकोट बंदोबस्त असतो. तिथे या यंत्राचा "मदरबोर्ड' बदलायचा म्हटले, तर देशात एकाच वेळी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवेळी सुमारे 30 लाख अभियंते लागतील, त्यामुळे हे शक्‍य आहे का? 

निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्ष "ईव्हीएम'विषयी काहीही बोलत नाहीत. निवडणुकीतर अपयश आल्यावर मात्र सगळेच पक्ष "ईव्हीएम'वर तोंडसुख घेतात, अशा पक्षांना थेट न्यायालयात खेचले पाहिजे, अशा शब्दात गावडे यांनी आरोप करणाऱ्यांवर टीका केली. याबरोबरच या यंत्राविषयी चुकीची माहिती देण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष प्रलोभने दाखवीत असल्याचे सांगितले. याबरोबरच आपल्याला दमदाटी करत असल्याचेही गावडे यांनी सांगितले. दरम्यान, "ईव्हीएम'संबंधी न्यायालयात असणाऱ्या प्रकरणांमध्ये गावडे यांना तज्ज्ञ म्हणून बोलाविले जाते. त्यामध्येही या यंत्राची सत्यता मांडण्याचे काम ते करतात. 

Web Title: Show polling machine hacked