शक्तिप्रदर्शनाने सांगता

शक्तिप्रदर्शनाने सांगता

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी संवाद साधत प्रचाराची राळ उडविली. गेल्या पंधरा दिवसांपासून धडाडणाऱ्या तोफा सायंकाळी थंडावल्या.

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर करण्यासाठी भाजपने चंग बांधला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट तसेच इतर मंत्र्यांनी हजेरी लावत सभा मैदाने गाजवल्याने अजित पवार यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. शह-काटशहाच्या राजकारणामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे भाकीत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. पण भाजप त्यात कितपत यशस्वी झाला हे २३ तारखेच्या निकालावरून स्पष्ट होईल. दरम्यान, प्रत्यक्ष मतदान मंगळवारी, तर गुरुवारी मतमोजणी होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. भाजपतर्फे देखील तोडीस तोड ‘स्टार प्रचारक’ आणण्यात आले. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सभा झाल्या. शिवसेनेतर्फे देखील प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन प्रचारात रंगत आणली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांचा त्यामध्ये समावेश होता. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई आदींच्या सभा झाल्या.

प्रचारात गाजलेले मुद्दे 
 अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाचा प्रश्‍न
 शास्तिकराचा अध्यादेश खरा की खोटा 
 सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवरील भ्रष्टाचाराचे आरोप
 शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकासकामे
 मुख्यमंत्र्यांकडून 
देण्यात आलेली आश्‍वासने
 भाजपने आयात उमेदवारांना दिलेली उमेदवारी

चुरशीच्या लढती 
प्रभाग क्र.१० (क) ः     मंगला कदम (राष्ट्रवादी)    शारदा बाबर (शिवसेना)     सुप्रिया चांदगुडे (भाजप)
प्रभाग क्र. ५ (ड) ः     अजित गव्हाणे (राष्ट्रवादी)    सचिन लांडगे (भाजप)
प्रभाग क्र. ८ (ड) ः     सारंग कामतेकर (भाजप)    विक्रांत लांडे (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ३२ (ड) ः     प्रशांत शितोळे (अपक्ष)    अतुल शितोळे (राष्ट्रवादी)    हर्षल ढोरे (भाजप)
प्रभाग क्र. २० (ड) ः     योगेश बहल (राष्ट्रवादी)    यशवंत भोसले (भाजप)
प्रभाग क्र. १३ (क) ः     सुलभा उबाळे (शिवसेना)    सुमन पवळे (राष्ट्रवादी)    अश्‍विनी चिखले (मनसे)
प्रभाग क्र. ३१ (ड) ः     राजेंद्र जगताप (भाजप)    नवनाथ जगताप (अपक्ष)
प्रभाग क्र. १९ (ब) ः     शमिम पठाण (राष्ट्रवादी)    जयश्री गावडे (भाजप)

ओल्या पार्ट्यांमुळे लाखोंचा चुराडा
या निवडणुकीला मिनी विधानसभेचे स्वरूप आले आहे. येत्या दोन दिवसांत आपापल्या प्रभागात जास्तीत जास्त मतदान कसे करून घेता येईल, यावर उमेदवारांचा भर असणार आहे. त्यासाठी काही उमेदवारांकडून पैशाचे आमिषही दाखविले जात आहे. जेवणावळी, जंगी ओल्या पार्ट्यांमुळे लाखो रुपयांचा चुराडा सुरू आहे. अखेरच्या दोन दिवसांत झोपडपट्ट्यांतील मतदानावर डोळा ठेवून राजकीय पक्षांकडून व उमेदवारांकडून मते खरेदी केली जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com