वारज्यात साकारतंय भव्य स्टेडियम

वारजे - महापालिकेच्या वतीने साकारण्यात येत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम.
वारजे - महापालिकेच्या वतीने साकारण्यात येत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम.

वारजे - महानगरपालिकेतर्फे वारजे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साकारण्यात येत आहे. ३० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमसाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ‘डे-नाइट’ खेळ खेळता येतील, अशी या स्टेडियमची रचना असून, तीन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

या स्टेडियमध्ये दोन सराव पीच व एक मुख्य पीच तयार करण्यात आले आहे. सध्या या भागातील तरुण या पीचचा क्रिकेटसाठी वापर करीत आहेत. साडेसहा एकर जागेवर हे स्टेडियम उभे राहत आहे. जवळच एक एकर जागेवर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होऊ शकतील, अशा पद्धतीने  स्टेडियमवर व्यवस्था करण्यात येत आहे.

सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. या स्टेडियमचा फायदा वारजे, कर्वेनगर, कोथरूड, बावधन, शिवणे या भागांतील मुलांसाठी होणार आहे. सध्या या भागातील मुलांना सरावासाठी शहरातील नेहरू स्टेडियम किंवा अन्य खासगी स्टेडियममध्ये जावे लागत आहे. त्यामुळे या मुलांचा वेळ व पैसा जात आहे. या स्टेडियममुळे या मुलांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे.

उपनगरातील मुलांना खेळण्यासाठी स्टेडियम होणे गरजेचे आहे. या उद्देशाने हे स्टेडियम उभे करण्यात येत आहे. यातून परिसरात चांगले क्रिकेटपटू घडण्यास मदत होणार आहे.
- सचिन दोडके, नगरसेवक

मुलांना मोठी मैदाने खेळण्यासाठी मिळत नाहीत व खेळायचे असेल, तर पैसे देऊन खासगी मैदानावर जावे लागते. त्यामुळे पालिकेने मैदाने निर्माण करणे गरजेचे आहे.
- गुरुनाथ काळे, क्रीडा शिक्षक

पालिकेतर्फे हे क्रिकेटचे मैदान होत आहे. सुविधांमुळे मुलांना याचा अभिमान राहणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
- रामदास कडू, कनिष्ठ अभियंता, पुणे महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com