काश्‍मिरातील सर्व पर्यटक सुखरूप

श्रीनगर - श्रीनगरसह अनेक विमानतळे बुधवारी बंद करण्यात आली होती, त्यामुळे विमानतळाबाहेर बसलेले प्रवासी.
श्रीनगर - श्रीनगरसह अनेक विमानतळे बुधवारी बंद करण्यात आली होती, त्यामुळे विमानतळाबाहेर बसलेले प्रवासी.

पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे फिरताना कोणतीही भीती वाटत नाही, असा विश्‍वास टुरिस्ट पोलिसांनी व्यक्त केला. 

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण तळांवर हल्ला करून ते उद्‌ध्वस्त केले. आज पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली, त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. आज श्रीनगर, लेह, जम्मूसह देशातील आठ विमानतळांवरील नागरी विमान उड्डाणे काही वेळासाठी थांबविली होती, त्यामुळे त्या वेळेत काश्‍मीरमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली. अशा पर्यटकांना मदत करण्यासाठी काश्‍मीर पर्यटन विभाग आणि तेथील हॉटेले पुढे सरसावली असल्याची माहिती काश्‍मीरमधील ‘टुरिस्ट रिसेप्शन सेंटर’ येथील पर्यटन पोलिसांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. या पार्श्‍वभूमीवर तेथील सर्व पर्यटक सुखरूप असल्याचेही 
त्यांनी सांगितले. 

याबाबत जम्मू आणि काश्‍मीर हॉटेलीयर्स क्‍लबचे अध्यक्ष मुश्‍ताक छाया म्हणाले, ‘‘विमानतळ बंद झाल्याने काही पर्यटकांना श्रीनगरमध्ये राहावे लागले आहे. त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. काश्‍मिरी लोकांनी कायमच पर्यटकांचे आदरातिथ्य केले आहे. अशा तणावाच्या काळातही आम्ही प्रत्येक पर्यटकासोबत आहोत.’’

पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांच्या ताफ्यावर जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केल्यानंतर नंदनवनातील पर्यटन अक्षरशः गोठले आहे. काश्‍मीर खोऱ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही सर्वाधिक संख्या पुणेकरांची आहे, अशी माहिती काश्‍मीर पर्यटन विभागातर्फे देण्यात आली.

हॉटेलचालकाकडून मोफत भोजन
श्रीनगर - भारत-पाकिस्तानातील तणावामुळे श्रीनगरचा विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला शेख बशीर अहमद हे हॉटेलचालक धावले. प्रवाशांसाठी मोफत जेवण आणि राहण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. श्रीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अहमद यांच्या हॉटेलात ३० खोल्या आहेत. परिस्थिती सुधारेपर्यंत आमच्याकडे सर्वांचे स्वागत आहे, असे अहमद यांनी सांगितले. विमानतळ आणि हमरस्त्यावरही प्रवासी अडकले असल्यामुळे त्यांची नक्की संख्या समजलेली नाही.

उत्तरेतील बंद विमानतळ पुन्हा सुरू
पाकिस्तानबरोबरच्या तणावामुळे नागरी वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आलेले उत्तर भारतातील नऊ विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक संचलनालयाच्या प्रवक्‍त्याने माहिेेती दिली.श्रीनगर, जम्मू, लेह, पठाणकोट, अमृतसर, सिमला, कांगडा, कुलू-मनाली आणि पिठोरागड हे विमानतळ आजपासून (२७ फेब्रुवारी) २७ मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com