Loksabha 2019 : बारणे, पार्थचे हस्तांदोलन; उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

साधारण दोन तासांच्या पदयात्रेनंतर पार्थ पवार प्राधिकरणाच्या कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोचले. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मयूर कलाटे उपस्थित होते. 

पिंपरी (पुणे) : मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी सकाळी वाल्हेकरवाडीतून पदयात्रेस सुरवात केली. त्यांच्या पदयात्रेस महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी त्यांच्या सोबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांनी मोरवाडीतील अहल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण केला. सायकलवरील होर्डिंग, झेंडे, चारचाकी आणि दुचाकी यांचा भलामोठा लवाजमा पदयात्रेत होता. पदयात्रेत चालणाऱ्यांना गुरुद्वारा चौकात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. साधारण दोन तासांच्या पदयात्रेनंतर पार्थ पवार प्राधिकरणाच्या कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोचले. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मयूर कलाटे उपस्थित होते. 

तर उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आकुर्डीतून पदयात्रेला सुरवात केली. त्यांच्यासोबत शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा दिसून आला. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी दिलजमाई झाल्यानंतर या पदयात्रेत भाजपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे भव्य पदयात्रेतून शिवसेनेचे झेंडे आणि भाजपच्या झेंड्यांनी परिसराला भगवा रंग चढला होता. महिलांचाही सहभाग मोठा होता. दुपारी एकच्या सुमारास बारणे यांचे प्राधिकरण कार्यालयात आगमन झाले. त्याच दरम्यान पार्थ पवार अर्ज दाखल करून बाहेर पडत होते. दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर येताच त्यांनी हसतमुखाने हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्तेही अचंबित झाले. बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरिश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार नीलम गोऱ्हे उपस्थित होते.

Web Title: Shrirang Barne and Parth Pawar filing nomination form for Loksabha election