ताप, सर्दी, खोकल्याने पुणेकर बेजार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे - दुपारी वाढलेला उन्हाचा चटका आणि पहाटे सुटणारा गार वारा या वातावरणातील बदलांमुळे विषाणूंनी डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखणे अशांनी पुणेकर आजारी पडले आहेत. 

मार्चच्या या आठवड्यात दुपारी तापमान आणि रात्री गारठा, असे वातावरणात बदल आढळून येऊ लागले. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, तसेच कंबरदुखी, सांधेदुखी, हाडांची दुखणी सुरू झाली आहे, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. तापमानातील सातत्याने बदलाने विषाणूंची क्षमता वाढत असून सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार बळावत आहेत.

पुणे - दुपारी वाढलेला उन्हाचा चटका आणि पहाटे सुटणारा गार वारा या वातावरणातील बदलांमुळे विषाणूंनी डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखणे अशांनी पुणेकर आजारी पडले आहेत. 

मार्चच्या या आठवड्यात दुपारी तापमान आणि रात्री गारठा, असे वातावरणात बदल आढळून येऊ लागले. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, तसेच कंबरदुखी, सांधेदुखी, हाडांची दुखणी सुरू झाली आहे, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. तापमानातील सातत्याने बदलाने विषाणूंची क्षमता वाढत असून सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार बळावत आहेत.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखीचा त्रास होत आहे. लहान मुलांमध्ये विशेषतः तापाचे प्रमाण अधिक आहे. 

डॉ. सागर वैद्य म्हणाले, ‘‘कमाल आणि किमान तापमानातील
तफावतीमुळे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्याच्या संसर्गातून थंडी, ताप अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे; पण त्यातून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि नियमित औषधोपचार या त्रिसूत्रीतून रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.’’
डॉ. सुभाष थोरात म्हणाले, ‘‘वातावरण बदलल्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होतो. आतापर्यंत थंडी होती; पण आता उन्हाळा वाढत आहे. वातावरणातील हा बदल स्वीकारताना शरीरातही काही बदल होतात. त्यातून सर्दी, खोकला, ताप येतो.’’

अशी घ्या काळजी 
- रात्री थंडीमध्ये घराबाहेर पडू नये 
- बाहेर गेल्यास गरम कपडे वापरावे 
- सर्दी, खोकला, झाल्यास गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात 
- डॉक्‍टरांच्या सल्लाशिवाय औषधे घेऊ नयेत 
- खोकताना रुमाल वापरावा

डॉक्‍टरांनो, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करावेत. कारण, शहरातील विषम वातावरणामुळे साध्या फ्लूसह स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, गर्भवती अशा जोखमीच्या रुग्णांमध्ये या आजाराचे गंभीर स्वरूप दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लुएंझाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचे लवकर निदान करून त्यांना तातडीने योग्य उपचार द्यावे, अशी सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व डॉक्‍टरांना गुरुवारी केली आहे. 

शहरात यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील डॉक्‍टरांची बैठक बोलविली होती. त्यात या सूचना देण्यात आल्या. तसेच, याबाबतची माहिती शहरातील क्षेत्रीय कार्यालयांकडे दिली जाणार आहे.  तेथून त्या सूचना त्यांच्या हद्दीतील प्रत्येक डॉक्‍टरांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा उभारली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी कळविली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘इन्फ्लूएंझाच्या विषाणूंच्या संसर्गात प्रतिबंध करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. याची लक्षणे दिसताच त्यावर प्रभावी उपचार करणे आवश्‍यक आहे. त्या सूचना डॉक्‍टरांना या बैठकीत दिल्या. निरोगी आणि सुदृढ व्यक्तीलाही इन्फ्लूएंझाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यावर उपचार करण्यास उशीर झाल्यास त्यातून रुग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्‍यता असते. त्यामुळे इन्फ्लूएंझाची लक्षणे दिसताच रुग्णाला तातडीने उपचार करणे आवश्‍यक आहे.’’ 

लक्षणांनुसार रुग्णांची वर्गवारी करून त्यांना उपचार देण्याचा तपशील डॉक्‍टरांना देण्यात आला आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये या लक्षणांवर तातडीने उपचार न झाल्यास गंभीर स्वरूप धारण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लक्षणे -
ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखणे, डोकेदुखी, जुलाब, लहान मुलांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप.

Web Title: Sickness Health Care