ध्वनिप्रदूषणामुळे आजारांना निमंत्रण - राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पुणे - ‘शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. तसेच नैराश्‍य येणे, ताणतणाव वाढणे याबरोबरच मानसिक आजारही होऊ शकतात. म्हणूनच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरवात करायला हवी,’’ असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी व्यक्त केले.

टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियम (टीएमसी) आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने जागतिक ध्वनिप्रदूषण जनजागृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण विषयाचे अभ्यासक यशवंत ओक, टीएमसीचे अध्यक्ष बी. आर. मल्होत्रा, सरचिटणीस डॉ. जे. जी. पाटील, परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे उपस्थित होते.

कार्यक्रमात राऊत यांनी ‘स्मार्ट सिटी, सायलेंट सिटी, पुणे सिटी’ या संकल्पनेवर सादरीकरण केले. ते म्हणाले, ‘‘काही वाहनचालक ‘हॉर्न’ वाजविण्याचा आजार झाल्यासारखे हॉर्न वाजवतात. हॉर्न वाजविण्यासंदर्भात परिवहन विभागाचे नियम असले, तरी नागरिकांनी स्वयंशिस्तीने वागले पाहिजे. वेग नियंत्रित ठेवल्यास हॉर्न न वाजवता गाडी चालविणे शक्‍य आहे.’’

एखादी व्यक्ती दिवसातून किमान १० ते १२ वेळा ‘हॉर्न’ वाजविते म्हणजे दरवर्षी किमान चार हजार वेळा हॉर्न वाजविते. वाहने आणि हॉर्नचा आवाज सातत्याने ऐकल्यास कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो, असेही ते म्हणाले.
ओक म्हणाले, ‘‘ध्वनिप्रदूषण हा माणसाचा अप्रत्यक्ष शत्रू आहे, हे समजून घ्यायला हवे. दिवाळी, गणेशोत्सव, लग्नसराई, सण-उत्सवांदरम्यान सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत आहे; परंतु वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नातून ध्वनिप्रदूषण टाळता येऊ शकते.’’ या वेळी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उपस्थितांनी शपथ घेतली.

Web Title: sickness invitation by sound polution