‘जागृती’मुळे लाभली तयांना दृष्टी

- संजय बेंडे
रविवार, 5 मार्च 2017

भोसरी - रक्‍तदान आणि नेत्रदानाचे मूल्य मोठे आहे. त्यामुळेच ‘जीवनभर रक्तदान, मृत्यूनंतर नेत्रदान’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या भोसरीतील जागृती सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नातून आतापर्यंत ६२ जणांना दृष्टी देण्याचे बहुमोल काम झाले आहे. संस्थेने ३५ जणांच्या नेत्रदानातून हे काम केले आहे. 

भोसरी - रक्‍तदान आणि नेत्रदानाचे मूल्य मोठे आहे. त्यामुळेच ‘जीवनभर रक्तदान, मृत्यूनंतर नेत्रदान’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या भोसरीतील जागृती सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नातून आतापर्यंत ६२ जणांना दृष्टी देण्याचे बहुमोल काम झाले आहे. संस्थेने ३५ जणांच्या नेत्रदानातून हे काम केले आहे. 

मृत व्यक्तीच्या नेत्रदानाचा प्रस्ताव अनेकदा त्याच्या कुटुंबीयांद्वारे धुडकावून लावला जातो. मात्र, दृष्टिहीन व्यक्‍तींची गरज ओळखून जागृती सोशल फाउंडेशनने नेत्रदानाबाबत जनजागृतीचे काम १७ ऑगस्ट २०१० पासून सुरू केले. या दिवशी राम फुगे, पराग कुंकूलोळ, अविनाश फुगे, विश्वास काशीद, स्वप्नील फुगे, नीलेश धावडे, डॉ. अनिल काळे, अक्षय तापकीर, दिनेश लांडगे, विकास ढगे, सौरभ घारे, राहुल खाचणे, संतोष नवलाखा, अविनाश मोहिते, प्रमोद झेंडे, सुनील कडुसकर, लॉरेन्स झेवियर्स यांनी एकत्र येऊन जागृती सोशल फाउंडेशनची स्थापना केली. 

अशी मिळाली प्रेरणा
एखाद्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय नेत्रदानाविषयी उत्सुक नसतात. भावनिक कारणाबरोबरच जनजागृतीचा अभावही त्यास कारणीभूत होता. त्यामुळे नेत्रदानाविषयी अडचणी येत होत्या. मृताच्या कुटुंबीयांच्या रोषालाही काही वेळा सामोरे जाण्याची वेळ येते. नेत्रदानाचे कार्य पुढे सरकत नव्हते. मात्र, त्यातून मार्ग काढण्याची संकल्पना नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित व्याख्यानातून सुचली.

या कार्यक्रमात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सुचविले की, ‘नागरिकांचा अर्ज भरून घेताना त्याच्या कुटुंबीयांचाही अर्ज भरून घ्यावा. त्याचप्रमाणे ‘मी स्वतः नेत्रदानाचा संकल्प केला आहे. माझ्या मृत्यूनंतर इतरांनी माझ्या डोळ्यांनी जग पाहण्यासाठी माझे नेत्रदान करावे,’ अशा आशयाचे स्टिकर तयार करून त्याच्यावर अर्जदाराने स्वतःची सही व नाव लिहून घरात दर्शनी भागात लावावे.’ ही युक्ती उपयुक्त ठरली आणि अनेक जण नेत्रदानासाठी स्वतःहून पुढे येऊ लागले. परिणामी, अनेक दृष्टिहिनांना सृष्टी बघता आली.

नेत्रदानासाठी दहा हजार अर्ज
नेत्रदानाविषयी आणखी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज असल्याचे मत राम फुगे यांनी व्यक्‍त केले. आतापर्यंत फाउंडेशनने दहा हजार कुटुंबीयांचे नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले आहेत. नेत्रदानाचा प्रसार होण्यासाठी सरकार आणि महापालिकेने पुढाकार घ्यावा. आतापर्यंत ज्या कुटुंबीयांमधील सदस्यांनी नेत्रदान केले आहे, त्या कुटुंबीयांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा, अशी संकल्पना फुगे यांनी मांडली आहे. 

यांच्यामुळे मिळाली दृष्टी
जागृती सोशल फाउंडेशनद्वारे २०१६-१७ या वर्षामध्ये शांतिलाल कटारिया, बसंतीबाई चोरडिया, पन्नालालजी गुगळे, पांडुरंग जाधव, शंकर शेंडे, रत्नप्रभा लाकाळ आदींनी नेत्रदान केले आहे.

नेत्रदानाचा प्रसार व्हावा, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. नेत्रदान करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 
- राम फुगे, अध्यक्ष, जागृती सोशल फाउंडेशन.   

Web Title: sights by jagruti