‘रिपाइं’ला हवे स्वतंत्र चिन्ह - आठवले

मिलिंद वैद्य - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 जानेवारी 2017

पिंपरी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहे. यासंबंधी पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

पिंपरी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहे. यासंबंधी पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

आठवले म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी गेल्या वेळी भाजप-शिवसेना-रिपाइं युती होती. तेव्हा आमच्या वाट्याला राज्यात २९ जागा आल्या होत्या. या वेळी शिवसेनेबरोबर युती होईल, असा आमचा प्रयत्न आहे. युती झाल्यास आम्हाला २५ ते ३० जागा हव्या आहेत. युती न झाल्यास आम्ही भाजपकडे ५० जागांची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून युतीसाठी प्रयत्न करणार आहोत.’’ 

ते म्हणाले, ‘‘मुंबई वगळता राज्यातील आठ महापालिकांच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग तयार करण्यात आल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली असून, मतदारांची संख्याही चौपट झाली आहे. अनेक ठिकाणी छोट्या विधानसभा मतदारसंघासारखी स्थिती राहणार आहे. पक्षाच्या उमेदवारांना एका प्रभागात एक आणि दुसऱ्या प्रभागात दुसरे चिन्ह मिळू शकते. त्यामुळे पक्षाला स्वतंत्र चिन्ह मिळाल्यास निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांचा प्रचार करताना सयुक्तिक ठरेल.’’

ते म्हणाले, ‘‘रिपाइंच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असाही पक्षात मतप्रवाह होता; परंतु त्यावर एकमत होणे अशक्‍य आहे. आम्हाला निवडणूक आयोगाची स्वतंत्र मान्यता असल्याने असे करणे उचित नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र चिन्हाचा प्रस्ताव आम्ही ठेवणार आहोत.’’

२००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी ‘रिपाइं’ने ‘राष्ट्रवादी’च्या ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर केला होता. त्या वेळी पक्षाला काही प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळेच पक्षाने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र चिन्हाचा प्रस्ताव देण्याचे ठरविले आहे.

Web Title: The sign should be independent RPI