स्पीच थेरपीने सुधारली वाचा

स्पीच थेरपीने सुधारली वाचा

पिंपरी - जन्मापासून सहा वर्षांच्या आत स्पीच थेरपी केल्यास जन्मतः मूकबधिर मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे बोलू शकतात. हे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील स्पीच थेरपी अर्थात वाचा सुधार केंद्रामुळे शक्‍य झाले आहे. गेल्या आठ वर्षांत वायसीएममध्ये उपचार घेतलेले ८७ मुले आता बोलू लागली आहेत. 

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात २०११ पासून स्पीच थेरपी केंद्र सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांची मूकबधिरतेची त्वरित तपासणी करणे शक्‍य झाले आहे. मूकबधिर मुलाला जन्मापासून तिसऱ्या वर्षांपर्यंत वायसीएममध्ये आणि त्यानंतर सहाव्या वर्षांपर्यंत पुण्यातील स्वरनाद संस्थेत वाचा व भाषा प्रशिक्षण दिले जाते. वायसीएममध्ये डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा कुलकर्णी, गौरी देवधर शिक्षिका म्हणून मुलांना घडवत आहेत. 

‘सकाळ’शी बोलताना डॉ. वाचासुंदर म्हणाले, ‘‘जगात एक हजारापैकी चार मुले जन्मतःच मूकबधिर असतात. त्यातील दोन मुले मातेच्या बाळंतपणाला उशीर झाल्यास, नात्यात लग्न झालेले असल्यास व जणुकात बदल घडल्यामुळे मूकबधिर होऊ शकतात. अशी मुले मेंदू व शरीराने चांगली असूनही ऐकू व बोलू शकत नाहीत. वयाच्या सहाव्या वर्षांनंतर मेंदूची बोलणे व शिकण्याची क्षमता संपत असल्यामुळे मुले बोलू शकत नाहीत. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत. संवाद साधू शकत नाहीत. पर्यायाने चांगला रोजगार मिळत नाही. शक्‍यतो लग्न होत नाही, झाल्यास मूकबधिर व्यक्तीशीच होते. अशा दांपत्याच्या पोटी मूकबधिरच मुले जन्माला येण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यामुळे पालकांनी नवजात बालकांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.’’ 

एका मुलासाठी एक तास अशी आमची शिकविण्याची पद्धत आहे. वाचा व भाषा प्रशिक्षण मुलांना देतो. त्यांना घरी शिकवता यावे, यासाठी मातांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते.   
- सीमा कुलकर्णी, शिक्षिका, स्पीच थेरपी सेंटर, वायसीएम

नातवाला ऐकू येत नसल्याचे कळल्यावर आम्हाला धक्का बसला. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार दोन वर्षांपासून त्याला वायसीएममध्ये घेऊन येते. आता तो चांगले बोलू लागला आहे. 
- तारा सोंडकर,  मूकबधिर मुलाची आजी, चिखली

जन्मतः मूकबधिर मुलांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्पीच थेरपी केंद्र सुरू झाले पाहिजे. ही एक सामाजिक चळवळ बनून व्यक्ती, संस्था, संघटनांनी आर्थिक मदत करायला हवी. मूकबधिर मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींना मानधन मिळायला हवे.
- डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ, चिंचवड 

मातांचे सक्षमीकरण
स्पीच थेरपीचा एक मूल, एक शिक्षिका, एक केंद्र, असा उपक्रम आहे. प्रात्यक्षिक व थेअरीच्या माध्यमातून दर शनिवारी चार तास प्रशिक्षण देऊन मूकबधिर मुलांच्या मातांचे सक्षमीकरण केले जाते. पालकांनीच शिक्षक बनून स्वतःबरोबर इतरांच्या मुलांना प्रशिक्षण द्यावे, अशी ही योजना आहे. 

स्पीच थेरपी केंद्र
पुणे जिल्हा : राजगुरुनगर (खेड), मंचर, जुन्नर, भोर, मार्गासनी (ता. वेल्हे), चिंचवड व वायसीएम हॉस्पिटल (पिंपरी). 
गोवा : पर्वरी व फोंडा. 
रत्नागिरी जिल्हा : दापोली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com