सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे.

पुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे.

पुण्याच्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे सफरचंद. हिमाचल प्रदेश आणि काश्‍मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. हिमाचल प्रदेशात उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची येथील बाजारपेठेत ‘सिमला’ म्हणून ओळख आहे. याचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत असतो. यानंतर काश्‍मीरमधील ‘कश्‍मिर डेलिशियस’ सफरचंदाचा हंगाम सुरू होतो. या दोन्ही सफरचंदांचा हंगाम संपल्यानंतर पुण्याच्या बाजारपेठेत अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील सफरचंदाची आवक होत असते. यामुळे वर्षभर बाजारपेठेत सफरचंद उपलब्ध असते.

हिमाचल प्रदेशात उंच आणि कमी उंचीच्या भागात सफरचंदाचे उत्पादन होते. प्रथम कमी उंचीच्या भागातील सफरचंदाची आवक होते. ‘या वर्षी उत्पादन चांगले असून, गेल्या आठवड्यात या सफरचंदाची आवक सुरू झाली आहे.

रविवारी सुमारे अडीच हजार बॉक्‍स आवक झाली. साधारणपणे २५ ते ३० किलोच्या बॉक्‍सला अडीच ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या भाव जास्त असला तरी आवक वाढल्यानंतर भावात घट होईल,’ असे व्यापारी करण जाधव यांनी नमूद केले.

सिमला सफरचंदाची आवक सुरू झाल्याने परदेशांतील सफरचंदाच्या भावात घट झाली आहे. आयात केले जाणारे सफरचंद शीतगृहात ठेवले जाते. सिमला सफरचंद तोडणीनंतर आठवड्याच्या आत बाजारात उपलब्ध होते. त्यामुळे ते खाण्यास ताजे असते. 
- करण जाधव, व्यापारी

Web Title: simala apple season start