ऑनलाइन व्यवसायासाठी ‘सिम्बा ॲप’!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे सुविधा; व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त

पुणे - अनेकविध उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीमुळे तुमच्या दुकानांतील विक्रीवर परिणाम झालाय ना आणि त्याला ऑनलाइनच उत्तर कसे द्यायचे, या विचारात तुम्ही पडला आहात ना? तर मग तुम्ही ‘सिम्बा’ ॲप डाउनलोड करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचा... तेही मोफत. तुमच्या दुकानांतील वस्तूंची छायाचित्र-व्हिडिओ, त्यांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोचेल आणि पुढच्या टप्प्यात तुम्हाला ऑनलाइन मागणीही स्वीकारता येईल. 

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे सुविधा; व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त

पुणे - अनेकविध उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीमुळे तुमच्या दुकानांतील विक्रीवर परिणाम झालाय ना आणि त्याला ऑनलाइनच उत्तर कसे द्यायचे, या विचारात तुम्ही पडला आहात ना? तर मग तुम्ही ‘सिम्बा’ ॲप डाउनलोड करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचा... तेही मोफत. तुमच्या दुकानांतील वस्तूंची छायाचित्र-व्हिडिओ, त्यांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोचेल आणि पुढच्या टप्प्यात तुम्हाला ऑनलाइन मागणीही स्वीकारता येईल. 

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या माध्यमातून सिम्बा ॲप पुण्यातील प्रसिद्ध गणेशाच्या चरणी आज (ता. १३) अर्पण करण्यात आले आणि मध्य पुण्यातील व्यापाऱ्यांना त्याची माहिती देण्याची मोहीमही सुरू करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माणिकराव साळुंके, कसबा गणपती सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अनंत गाडगीळ, प्रशांत टिकार, तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष विवेक खटावकर, विनायक कदम, तुळशीबाग छोटे व्यावसायिक संघटनेचे खजिनदार शिवाजी सुर्वे यांच्यासह अनेक छोटे व्यावसायिक आणि यिनचे सदस्य या वेळी उपस्थित होते.  

इस्राईलहून खास आलेले असाफ किंडलर यांनी उपस्थितांना सिम्बा ॲपची माहिती दिली. व्यवसायाची माहिती, संपर्क क्रमांक, मेसेज, कॉल्स डिटेल्स यांच्या उत्पादनाची माहितीदेखील या ॲपवर अपलोड करता येते.

व्यावसायिकांच्या दृष्टीने ॲप उपयुक्त असल्याने ते डाउनलोड करून घेण्याची तयारीही अनेकांनी दर्शविली. किंडलर म्हणाले, ‘‘डिजिटल इंडिया ही संकल्पना भारतात रुजू होऊ लागली आहे. भविष्यात बहुतांश व्यवहार अँड्रॉइड फोनद्वारे होणार आहेत. ॲपद्वारे व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची माहिती ग्राहकांना ऑनलाइन देऊ शकतील. परिणामी, व्यावसायिकांच्या व्यवसायवृद्धीला चालना मिळेल. त्यांचे उत्पन्नही वाढेल.’’ हे ॲप डाउनलोड करण्यासाठी यिनचे सदस्य दुकानदारांना मदत करणार आहेत.

शेटे म्हणाले, ‘‘ऑनलाइन मार्केटिंगद्वारे व्यावसायिक ग्राहकांपर्यंत त्वरित पोचू शकतात. सिम्बा ॲप छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोचविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य राहील.’’ 

गाडगीळ म्हणाले, ‘‘ऑनलाइन शॉपिंग ही संकल्पना चांगली आहे. व्यापाऱ्यांनी ते डाउनलोड करून घ्यावे.’’ खटावकर म्हणाले, ‘‘व्यावसायिक क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. दुकानदारांना ग्राहकांपर्यंत आणि ग्राहकांना दुकानदारांपर्यंत पोचण्यासाठी मोबाईल ॲपचा निश्‍चितच उपयोग होऊ शकतो. तुळशीबाग परिसरातील अनेक छोट्या व्यावसायिकांनी हे ॲप डाउनलोड करून घेतल्यास त्याचा लाभ त्यांनाच होईल.’’ 

गोडसे म्हणाले, ‘‘ॲपद्वारे व्यवसाय करणे ही कॅशलेसच्या दिशेने असलेली वाटचाल आहे. ॲपद्वारे ग्राहकांपर्यंत पोचणे सोईस्कर होईल. ‘सकाळ’ने मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.’’ 

सूर्यवंशी म्हणाले, ‘‘छोट्या व्यावसायिकांसाठी सिम्बा ॲप उपयुक्त आहे. कारण ॲपवर व्यवसायाची माहिती दिल्यावर, ग्राहकांकडून ऑनलाइन ऑर्डर मिळविणेही सोईचे होईल. उदा. नारळ विक्रेत्याचा एखादा स्टॉल आहे.

ॲपवरील त्याच्या व्यवसायाची माहिती वाचून, एखादी व्यक्ती नारळाच्या तोरणाची आगाऊ ऑर्डर देऊ शकते. त्यात विक्रेते, ग्राहक दोघांचाही फायदा आहे.’’

सिम्बा ॲपची वैशिष्ट्ये 
छोट्या विक्रेत्यांना ऑनलाइन माध्यमाचे मोफत व्यासपीठ
ॲप डाउनलोड केल्यास दुकानाची वेबसाइट तयार
वेबसाइटच्या माहितीचा सोशल मीडियाद्वारे प्रसार करणार
ॲपवर उत्पादनाचे छायाचित्र-व्हिडिओ आणि माहिती पाहता येणार
ऑनलाइन विक्रीमुळे दुकानदारांचे उत्पन्न वाढणार
सिम्बा डाउनलोड करण्यासाठी यिनची मदत होणार 

Web Title: simba app for online business