Singapur-Pattern
Singapur-Pattern

‘सिंगापूर पॅटर्न’ ठरतोय लक्षवेधी

पुणे - शालेय शिक्षणात आघाडीचा देश मानला जाणाऱ्या सिंगापूरने प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील परीक्षेतून विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांवरील अभ्यास आणि परीक्षेचा ताण आणि वाढती स्पर्धा कमी करण्यासाठी प्रगतिपुस्तकात श्रेणीचा उल्लेख न करणे, पहिली आणि दुसरीसाठी साचेबद्ध परीक्षा बंद करणे, असे महत्त्वूपर्ण बदल धोरणात केले आहेत. त्याशिवाय ‘ॲप्लाइड लर्निंग’ची पद्धत २०२३पर्यंत रुढ करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचाविण्यासाठी सिंगापूरने रुढ शिक्षण पद्धतीचा फेरविचार करीत शैक्षणिक धोरणात काही दिवसांपूर्वीच बदल केले आहेत. प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (पिसा) या चाचणीत सिंगापूरने वर्चस्व सिद्ध केले. काही वर्षांपूर्वी पिसाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर सिंगापूरच्या शिक्षणाबद्दल जगभरात चर्चा सुरू झाली. त्यानंतर तेथील मुलांचे समान्यज्ञान, गणिते सोडविण्याचे कौशल्य, पाचवी-सहावीच्या वर्गातील मुलांची गणिते, याबद्दल बोलले जाऊ लागले. राज्यातीलच नव्हे, तर देशातील अनेक शैक्षणिक संस्थादेखील सिंगापूरमधील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा करू लागले आणि आता तेथील सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

नव्या धोरणानुसार गुण आणि गुणांकन देण्याऐवजी गृहपाठ आणि प्रश्‍नमंजूषा यावरून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्याकंन करण्याचे सिंगापूर सरकारने निश्‍चित केले आहे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी साचेबद्ध परीक्षेची पद्धत बंद करण्यात येत आहे. त्याशिवाय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण, स्पर्धा कमी करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. शैक्षणिक यशाऐवजी सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जाणार आहे.

कौशल्यपूर्ण शिक्षणाला प्राधान्य
विद्यार्थ्यांमधील सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्यात, तसेच त्यांच्यात निर्णयक्षमतेचे कौशल्य विकसित व्हावे, याला केंद्रस्थानी ठेवून तेथील सरकारने नवे बदल केले आहेत. सिंगापूरमध्ये २०२३पूर्वी स्वयंअध्ययन, कौशल्य विकास, प्रात्यक्षिक यावर आधारित ‘अप्लाइड लर्निंग’ पद्धती रुढ करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. यापुढील काळात तेथील शालेय शिक्षणात नाटक, खेळ यांबरोबरच संगणक आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स यावर भर दिला जाणार आहे.

सिंगापूर येथील नव्या शैक्षणिक धोरणात अंतर्गत मूल्यमापनाला प्राधान्य दिले आहे. आपल्याकडेही विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन होणे आवश्‍यक आहे. विविध उपक्रमांवरून मूल्यमापन केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो.
- डॉ. वसंत काळपांडे, माजी शिक्षण संचालक 

शिकणे म्हणजे केवळ पाठांतर करून परीक्षेत चांगले गुण मिळवणे असे नाही, तर शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अभिप्रेत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या लेखनाबरोबरच भाषण, वाचन, संवाद कौशल्य विकसित होणे आवश्‍यक आहे.
- सदाशिव पाटील, उपमुख्याध्यापक, बालमोहन विद्या मंदिर, मुंबई

आपल्याकडे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारा घटक (शिक्षक) कमकुवत असल्यामुळे शिक्षणातील नवा विचार, दृष्टिकोन प्रभावीपणे संक्रमित होताना दिसत नाही. ‘ॲप्लाइड लर्निंग’ काळाची गरज आहे.
- अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com