सिंहगड बंद मात्र तरीही पर्यटकांची झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinhagad closed but still crowded with tourists

सिंहगड बंद मात्र तरीही पर्यटकांची झुंबड

सिंहगड - सिंहगड पर्यटकांसाठी बंद असताना रविवारची सुट्टी व पावसाचा जोर कमी झाल्याने हजारो पर्यटक सिंहगडावर जाण्यासाठी आले मात्र सिंहगड पायथ्याशी गोळेवाडी येथे असलेल्या वन विभागाच्या तपासणी नाक्यावरुन सर्वांना हताश होऊन माघारी परतावे लागत आहे. गड बंद असल्याचे सांगून-सांगून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मात्र नाकी नऊ आल्याचे दिसत आहे. गड बंद असल्याची माहिती दर्शक फलक लावलेला नसल्याने पर्यटकही कर्मचाऱ्यांकडे गड का बंद आहे याची 'कसून चौकशी' करत आहेत.

मुसळधार पाऊस व दरडींचा धोका या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दि. 14 जुलै ते 17 जुलै 2022 पर्यंत सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पुर्ण बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापुर्वीच संभाव्य धोका ओळखून वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सिंहगड बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याबाबत अहवाल दिला होता. त्यानुसार सिंहगड बंद करण्यात आलेला आहे मात्र तरीही हजारो पर्यटक सिंहगडावर जाण्यासाठी येताना दिसत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर पर्यटकांना अडवत असून माघारी जाण्याची विनंती करत आहेत. अनेक सुशिक्षित नागरिक मात्र कोणाचा आदेश आहे? कधीपर्यंत बंद आहे? पायी चालत जाऊ शकतो का?आदेशाची प्रत आहे का? असे प्रश्न करुन वन कर्मचाऱ्यांना हैराण करत आहेत.

"आज सुट्टी होती व पाऊसही कमी होता त्यामुळे सर्व मित्र मिळून सिंहगडावर जाऊन येण्याचे नियोजन केले होते. इथे आल्यावर कळले गड बंद आहे म्हणून. आता परत माघारी गेल्याशिवाय पर्याय नाही."

- ओम सरनाईक, तरुण पर्यटक, कर्वेनगर.

"गड बंद असल्याबाबत एखादा बोर्ड लावला असता तर आम्ही कशाला विचारत बसलो असतो? बोर्ड वाचून माघारी फिरलो असतो."

- संतोष कदम, पर्यटक, पाषाण.

"स्थानिक वन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सिंहगड बंद असल्याची माहिती दर्शक बोर्ड तपासणी नाक्यावर लावण्यास सांगितले होते मात्र त्यांनी लावला नसावा. आज रात्री बारा वाजेपर्यंत सिंहगड बंदचा आदेश आहे, उद्या सकाळपासून सिंहगड सर्वांसाठी खुला होईल. पर्यटकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे."

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

Web Title: Sinhagad Closed But Still Crowded With Tourists

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top