धूळ खात करावा लागतोय व्यवसाय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सकाळी दुकान उघडल्यानंतर माझा अर्धा ते एक तास दुकानातील धूळ साफ करण्यातच जातो. दुकानातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर धूळ बसल्याने त्या खराब होत आहेत. मला दुकानातसुद्धा तोंडाला रुमाल बांधून बसावे लागते. रस्ता खराब असल्याने धंद्यावर तर परिणाम होतच, शिवाय माझे आरोग्यही धोक्‍यात आले आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया किरकटवाडी फाटा येथे इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती व विक्री करणारे व्यावसायिक विकास आमले यांनी दिली. संदीप लांगोरे, मनोज झांबरे यांनीही या रस्त्याचे काम रखडल्याने त्रास होत असल्याबाबत सांगितले

पुणे : सकाळी दुकान उघडल्यानंतर माझा अर्धा ते एक तास दुकानातील धूळ साफ करण्यातच जातो. दुकानातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर धूळ बसल्याने त्या खराब होत आहेत. मला दुकानातसुद्धा तोंडाला रुमाल बांधून बसावे लागते. रस्ता खराब असल्याने धंद्यावर तर परिणाम होतच, शिवाय माझे आरोग्यही धोक्‍यात आले आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया किरकटवाडी फाटा येथे इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती व विक्री करणारे व्यावसायिक विकास आमले यांनी दिली. संदीप लांगोरे, मनोज झांबरे यांनीही या रस्त्याचे काम रखडल्याने त्रास होत असल्याबाबत सांगितले. 

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले सिंहगड रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने कामाबाबत नागरिक आणि वाहनचालक संशय व्यक्त करीत आहेत. नागरिक व पर्यटक खड्डे आणि धुळीने हैराण झाले आहेत. नांदेड फाटा ते डीआयएटी गेटपर्यंत असलेल्या सुमारे चार किलोमीटरच्या अंतरात दोन वर्षांत केवळ 500 ते 700 मीटर एवढेच काम करून झाले आहे. जे कॉंक्रिटीकरण झाले आहे तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येते. 

रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्याचा खूप त्रास होत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी परिसरातील शेतकरी भाजी विकण्यासाठी बसतात. शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेल्या ताज्या भाज्यासुद्धा धुळीने खराब होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ व ज्या नागरिकांना धुळीची ऍलर्जी आहे, असे सर्व जण या धुळीने त्रस्त झाले आहेत. 

या भागातील नागरिक मात्र अगोदर पावसाने झालेल्या खड्ड्यांनी व आता धुळीने बेजार झाले आहेत. प्रशासनाने केवळ आश्‍वासने न देता प्रत्यक्षात कामाचा वेग वाढवावा व नागरिकांना या रस्त्याच्या त्रासातून मुक्त करावे. ठेकेदार वेळकाढूपणा करत असेल तर नियमानुसार त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. 

ठेकेदाराने डोणजे फाट्यापासून पुढे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे. ठेकेदाराला इतर पोट ठेकेदारांना काम न देता स्वतः काम करण्याबाबत बजावले आहे. नांदेड फाट्यापासून असलेले सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे कामही लवकरात लवकर सुरू केले जाईल. रस्त्यावरून जाणाऱ्या जड वाहनांची संख्याही खूप जास्त असल्याने धूळ उडते. 
ज्ञानेश्‍वर राठोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhagad road condition is bad