पुणेकरांनो, सिंहगड रस्ता, कसब्यात वाढले रुग्ण; वारजे सर्वांत कमी 

pune-ward--corona-patient
pune-ward--corona-patient

पुणे - लॉकडाउनच्या काळात कोरोनाचा "हॉटस्पॉट' ठरलेल्या भवानी पेठ आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाची जागा आता अनलॉकच्या पहिल्याच टप्प्यात कसबा व सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांनी घेतल्याचे दिसते. या दोन्ही भागांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. 

राज्यातील कोरोनाचे पहिले रुग्ण सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले; पण त्यानंतर प्रभावी उपाययोजना करून या कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागात रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. मात्र, त्याचकाळात दाट लोकसंख्येच्या भवानी पेठ, येरवडा भागात रुग्णांची संख्या वाढली. लॉकडाउनमध्ये या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

प्रभावी नियंत्रण 
मध्य वस्तीतील पेठांना जोडणारे मार्ग पत्रे ठोकून बंद करण्यात आले. शहराचा इतर भाग "न्यू नॉर्मल' होत असला तरी भवानी पेठ, कसबा, येरवडा अशा "हॉटस्पॉट'मधील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या गेल्या. तेथे सर्वेक्षण करण्यात आले. लक्षणे दिसणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार देण्यात आले. विलगीकरण, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, घरातच सुरक्षित राहाणे, निर्जंतुकीकरण अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात उद्रेक नियंत्रित करण्याचे प्रभावी उपाय राबविण्यात आले. 

सिंहगड रस्त्यावरील उद्रेक 
लॉकडाउनच्या काळात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात रुग्णांची संख्या नियंत्रित होती; पण या कार्यालयांतर्गत येणाऱ्या जनता वसाहतीमध्ये लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचे निदान झाले. त्यामुळे या दाट लोकसंख्येच्या भागात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. त्यामुळे लॉकडाउनमध्ये शहरातील 15 पैकी सातव्या-आठव्या स्थानावर असलेले हे क्षेत्रीय कार्यालय रुग्णसंख्येत आता दुसऱ्या क्रमांकावर आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वारजे सर्वांत कमी 
शहराच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली. 367 रुग्णांना कोरोनाचे निदान झाले असून, त्यापैकी 165 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कसबा क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. तेथे 677 रुग्ण सध्या असल्याची नोंद महापालिकेत झाली. 

59 टक्के रुग्णांना डिस्चार्ज 
शहरात शुक्रवारपर्यंत (ता. 26)14 हजार 185 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी सध्या उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या पाच हजार 325 (37 टक्के) आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले आठ हजार 302 (59 टक्के) रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत; तर 558 (4 टक्के) रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात पुणे तिसऱ्या क्रमांकावर 
राज्यात गुरुवारपर्यंत (ता. 25) एक लाख 47 हजार 741 रुग्णांची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील 18 हजार 15 रुग्णांचा (12.10 टक्के) त्यात समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 48 टक्के (70 हजार 878) रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आहेत; तर दुसऱ्या क्रमांकावर ठाणे आहे. तेथे 29 हजार 488 (20 टक्के) रुग्णांची नोंद झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com