सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा झालेले सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 17) सायंकाळी अटक केली. सायंकाळी त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने गेल्या आठवड्यात नवले व प्राप्तीकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांना सात दिवसांची साधी कैद आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर आज पोलिसांनी ही कारवाई केली. 

पुणे पोलिसांनी सायंकाळी नवले यांना अटक करून ससून रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली. अनेक महिन्यांपासून वेतन थकवल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांनी अनेक आंदोलने केली होती. संस्थेने त्यांच्या आंदोलनानंतरही दखल घेतली नव्हती. अखेर प्राध्यापकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर प्राध्यापकांचे सुमारे 18 कोटी रुपयांचे थकित वेतन तीन टप्प्यांत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 

संस्थेला समाजकल्याण विभागाकडून येणे असलेले सुमारे नऊ कोटी रुपये संस्थेच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यात जमा झाले होते. प्राप्तिकर खात्याने नवले यांची खाती गोठवली होती. न्यायालयाने नऊ कोटी रुपये काढण्यासाठी तोंडी आदेश दिले आहेत, अशा आशयाचे पत्र नवले यांनी बॅंक आणि प्राप्तिकर खात्याला दिले. त्यानुसार प्राप्तिकर खात्याने पैसे काढण्यास परवानगी दिली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नवले आणि प्राप्तिकर खात्याचे अधिकारी मोकाशी यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई केली होती.

Web Title: Sinhgad Institute president Maruti Navale arrested