सिंहगडच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

धायरी - सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याचे काम आज अखेर सुरू झाले आहे. यासाठी ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केला होता.  

धायरी - सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याचे काम आज अखेर सुरू झाले आहे. यासाठी ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केला होता.  

वडगाव फनटाइम ते पु. ल. देशपांडे उद्यान हा कालव्याशेजारील रस्ता तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात वडगाव फनटाइम ते विश्रांतीनगर या टप्प्यातील रस्त्याचे काम मार्गी लागत आहे; पण तसे झाले असले तरी त्या रस्त्याने आलेली वाहतूक मात्र मुख्य सिंहगड रस्त्याला वळविणे गरजेचे होते. म्हणूनच इनामदार चौक ते विश्रांतीनगर हा सुमारे २५० मीटर लांबीचा १८ मीटर रुंदीचा रस्ता होणे गरजेचे होते; परंतु गेल्या वर्षभरापासून काम रखडले होते. त्यासाठी ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केला. या रस्त्याला बाधित असलेली झाडेदेखील काढण्यात आली; परंतु येथील सीमा भिंतीचे आणि रस्त्याचे काम रखडले होते. ते काम आता सुरळीत सुरू होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. २५० मीटरचा रस्ता, सीमा भिंतीचे काम, आणि अर्बन डिझाइन संकल्पनेंतर्गत चौकाचे सुशोभीकरण यासाठी १.५ कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली. 

गेल्या वर्षभरात कोणताही निधी उपलब्ध न झाल्याने हे काम रखडले होते. ते काम आता मार्गी लागले आहे. या कामास सुरवात करताना कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे, उपअभियंता विठ्ठल इंगवले, शाखा अभियंता सचिन बागडे, नगरसेवक श्रीकांत जगताप, ॲड. प्रसन्न जगताप, नगरसेविका ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या तीन महिन्यांत १८ मीटर रुंदीचा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: sinhgad option road work start