कायदा सुव्यवस्थाही स्मार्ट ठेवू - पोलिस आयुक्त वेंकटेशम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

सिंहगड रस्ता परिसराचा झपाट्याने विकास होत असताना त्यासाठी स्मार्ट पोलिस ठाण्याची गरज होती. या ठाण्यामुळे या भागातील कायदा सुव्यवस्थाही स्मार्ट ठेवू, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.

सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता परिसराचा झपाट्याने विकास होत असताना त्यासाठी स्मार्ट पोलिस ठाण्याची गरज होती. या ठाण्यामुळे या भागातील कायदा सुव्यवस्थाही स्मार्ट ठेवू, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.

भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून हिंगणे येथे सिंहगड पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले, त्या वेळी डॉ. वेंकटेशम बोलत होते.

खासदार गिरीश बापट, आमदार मिसाळ, अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, नगरसेविका ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, अनिता कदम, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, आनंद रिठे, महेश लडकत, हरीश परदेशी आदी या वेळी उपस्थित होते.

देशपातळीवर देण्यात येणारा स्मार्ट पोलिस ठाणे हा पुरस्कार अद्याप पुण्याला मिळाला नाही. तो येत्या काळात सिंहगड पोलिस ठाण्याच्या रूपाने मिळेल, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. व्येंकटेशम यांनी व्यक्त केला.

या वेळी सिंहगड पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या भूमिपूजनासह तीन कोटी रुपयांची विविध विकासकामे, पु. ल. देशपांडे उद्यानातील फेज तीन अंतर्गत कलाग्राम, पर्वती देवस्थान सुशोभीकरण अशा कामांचेही भूमिपूजन करण्यात आले.

नागरिकांच्या सोयीसाठी विविध कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या भागातील वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न लवकरच सुटेल, असे मिसाळ यांनी सांगितले.

आमदारांमुळे येथील कामे वेळेत होत आहेत, नागरिकांना याचा फायदा होत आहे, असे खासदार बापट यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhgad Police Station Land Worship