
नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील राजाराम पूल ते भा. द. खेर (संतोष हॉल) चौकापर्यंतचा मोटारीतून जेमतेम पाच मिनिटांचा प्रवास.
सिंहगड रस्ता : एक किलोमीटरला ५० मिनिटे
पुणे - नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील राजाराम पूल ते भा. द. खेर (संतोष हॉल) चौकापर्यंतचा मोटारीतून जेमतेम पाच मिनिटांचा प्रवास. पण, संध्याकाळी सात वाजल्यानंतर या प्रवासाला आता १०-१५ नाही, तर तब्बल ४०-५० मिनिटे लागतात. हा एक दिवसाचा अनुभव नाही, तर नित्याचाच भाग झाल्याचा अनुभव या रस्त्यावरील प्रवाशांना येत आहे.
अक्षरशः मुंगीच्या पावलाने सिंहगड रस्त्यावरून वाहतूक पुढे सरकते. विठ्ठलवाडीपासून सुरू होणारी वाहतूक कोंडी धायरीपर्यंत असते. कधी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे, कधी पाऊस पडल्यामुळे, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग तर कधी रस्त्यातील खड्ड्यांमुळे अशा वेगवेगळ्या कारणांनी या रस्त्यावर वाहतूक कोंडी ठरलेलीच असते. सध्या सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असले तरीही उपाययोजनांबाबत प्रशासकीय उदासीनता हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.
सोमवारी (ता. ४) सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू होता. सव्वा सातच्या सुमारास मी राजाराम पूल ओलांडला, त्यानंतर पुढील १५-२० मिनिटांत धायरीत घरी पोहचेल अशी अपेक्षा होता. विठ्ठलवाडीपासून वाहतूक कोंडी सुरू झाली, मुंगीच्या पावलाने वाहतूक पुढे सरकत होती. बेशिस्त पार्किंग, त्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडीत आणखी भर पडत होती. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता आधीच लहान झाला, त्यात परत या अडथळ्यांनी गाडी चालविताना वैताग आला. धायरीत पोचायला तब्बल दीड तास लागला. अशाच प्रकारे अख्खा पावसाळा घालवायचा का? असा प्रश्न उपस्थित करत ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी महापालिका आणि पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पण, यात महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे आधीच रस्ता अरुंद झालेला असताना रस्त्यावरील अतिक्रमण जसेच्या तसेच आहे. महापालिकेकडून याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असली तरी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांना भीती राहिलेली नाही. तसेच, ब्रह्मा व्हेज हॉटेल ते माणिकबागेतील पेट्रोल पंप या अरुंद रस्त्यावर भर पावसाळ्यात काम सुरू केल्याचा फटका काल (ता. ४) नागरिकांना बसला.
या दरम्यान दुकानांचे अतिक्रमण, राजकीय स्टॉल यासह दुकानांपुढील पार्किंग, लोखंडी जाळ्या तशाच असल्याने पादचारी व वाहनचालकांचे हाल झाले. हा त्रास नागरिकांना होणार असल्याचे ‘सकाळ’ने वृत्ताच्या माध्यमातून यापूर्वी मांडले; पण बेफिकीर प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही.
प्रवाशांचे हाल
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने ब्रह्मा व्हेज येथील पीएमपी बसथांब्याचे शेड काढून टाकले. त्यामुळे प्रवाशांना भर पावसात रस्त्यावर थांबण्याची नामुष्की येत आहे. मात्र, याच रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण, राजकीय अतिक्रमण महापालिकेने काढलेले नाही.
या उपाययोजना आवश्यक
उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तेथे रस्त्यातील खड्डे बुजविणे, चुकीच्या कामामुळे झालेले उंचवटे काढून टाकून चांगला रस्ता करणे.
दुकानांसमोरील अतिक्रमण, बेकायदा पथारी, राजकीय लोकांचे बेकायदा स्टॉल काढून टाकणे
पार्किंग करू नये यासाठी रस्त्यात टाकलेल्या जाळ्या काढून टाकणे
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे
चुकीच्या पद्धतीने लावलेल्या चारचाकींवर कारवाई करणे
एकावेळी तिन्ही रस्त्यांवर कोंडी
शहरात सोमवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला, पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. पण वाहतूक कोंडी होण्यासाठी हे कारण नव्हे, तर महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने नागरिकांनी पर्यायी कॅनॉल रस्त्याचा वापर सुरू केला, पण तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्याचा परिणाम दामोदरनगरमधील रस्त्यावरही वाहतूक वाढली. एकाच वेळी तिन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याची भीषण स्थिती पाहायला मिळाली.
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पण नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन अतिक्रमण विभाग, प्रकल्प विभाग, वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक लावून उपाययोजना केल्या जातील.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
आॅफिसमधील काम संपवून सायंकाळी ६ वाजता खराडीवरून निघालो, पुढील तासाभरात राजाराम पुलापर्यंत पोचलो. पण त्यानंतरचा प्रवास प्रचंड खडतर होता. हिंगणे चौक, संतोष हॉल चौक, माणिकबाग, गोयल गंगा चौक येथे प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे घरी पोचायला मला साडेआठ वाजले. महापालिकेने अतिक्रमण काढले तर हा रस्ता आणखी मोठा होऊ शकतो.
- अमित जाधव, नागरिक, धायरी
तुमचा अनुभव काय?
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका तुम्हालाही बसतोय का? महापालिका आणि पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होतेय का?... याबाबत आपले मत आम्हाला नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Web Title: Sinhgad Road Daily Traffic Issue In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..