अभिजीत उभे यांनी सर केला माऊंट थैलु | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

अभिजीत उभे यांनी सर केला माऊंट थैलु

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : उत्तराखंड गढवाल हिमालयातील सहा हजार मीटर उंचीचे माउंट ‘थैलु’ शिखर हे पुण्यातील ४४ वर्षीय अभिजित चंद्रकांत उभे यांनी नुकतेच यशस्वीपणे सर केले आहे. २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत त्यांनी थैलु मोहीम पूर्ण केली. ही मोहीम त्यांनी एकट्याने पूर्ण केली असून मोहिमेदरम्यान त्यांना एव्हरेस्ट शिखरवीर आणि ‘स्नो स्पायडर’ संस्थेचे विष्णू सेमवाल यांनी सहकार्य केले.

पुण्यातील अभिजित हे व्यावसायिक असून गेल्या २० वर्षांपासून ते विविध शिखरांवर गिर्यारोहणाच्या मोहिमा करत आहेत. याबाबत अभिजित यांनी सांगितले, ‘‘ माउंट थैलुचे आकर्षण हे २०१९ सालच्या मात्री ग्लेशियर मधील शिखराजवळील मात्री त्रिशुलच्या यशस्वी मोहिमेनंतर जास्त तीव्र झाले. परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे गिर्यारोहणावर ही निर्बंध आल्यामुळे ही मोहीम यंदा ऑक्टोबरमध्ये पूर्ण केली. या आधी १९९२ साली पुण्यातील ज्येष्ठ गिर्यारोहकांनी ‘माउंट थैलु’ची मोहीम यशस्वी केली होती. त्यामुळे हे शिखराशी संबंधित माहितीसाठी मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. मोहिमेसाठी पुणे, दिल्ली, हरिद्वार, उत्तरकाशी, गंगोत्री- गोमुख, रक्तवर्ण-थैलु हिमनदी, थैलु ग्लेशियर-गोमुख कोल किंवा मात्री कोल शिखर माथा असा मार्ग ठरला.’

शिखरावर जाण्यासाठी मात्री कोल या मार्गाची निवड करण्यात आली. हा मार्ग गिर्यारोहकांची शारिरिक व मानसिकतेचा कस पाहणारी आहे. बहुतांशवेळा थैलुवर जाण्यासाठीचे प्रयत्न हे या मार्गावरून परत येतात. शिखरावर चढताना हिमभेगा या बर्फामुळे झाकल्या गेल्याने प्रत्येकवेळी काळजीपूर्वक पावले टाकत होतो. तसेच सूर्याच्या उनाहमुळे पायाखालील बर्फावर आम्ही घसरत होतो. त्यामुळे चढताना अडचणी येत होत्या. मात्र तरी सुद्धा या परिस्थितीवर मात करत शिखराची चढाई केली. शिखरावरून खाली येताना बर्फ आणि फरशी सारख्या दगडांमधून विशेष काळजी घेण्यात आली. हिमनदीच्या पाण्याचा प्रवाह आणि पाऊस याची ही अनुभूती या मोहिमेत झाली, असे अनुभव अभिजित यांनी सांगितले.

‘‘गेल्या २५ वर्षांमध्ये अनेक वेळा विविध शिखरांवर केलेले गिर्यारोहण यामुळे झालेल्या शारीरिक आणि मानसिक तयारीचा मला या मोहिमेत उपयोग झाला. तसेच इतक्या वर्षात राजीव बाहेती, जेडियल संजय, राजेंद्र बागडे, सुभाचंद्र आवटे आदींचे मिळालेले मार्गदर्शन सुद्धा कामी आले. मोहीम पूर्ण करत असताना निसर्ग साथ देत होता आणि आम्ही डोळे भरून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होतो. शिखर माथ्यावरून मात्री त्रिशुल पाहताना २०१९ सालचे नियोजन आता पूर्ण झाले याचा आनंद होता.’’

- अभिजित चंद्रकांत उभे, गिर्यारोहक

loading image
go to top