सर रामन यांच्या आठवणींना उजाळा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 6 जून 2019

‘नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९३१ मध्ये स. प. महाविद्यालयात कडुनिंबाची चार झाडे लावण्यात आली. अठ्ठ्याऐंशी वर्षांची ही झाडं आजही आम्हाला मायेची सावली देत आहेत,’ अशी भावना उपप्राचार्य डॉ. अनिल दुसाने यांनी व्यक्त केली.

पुणे -  प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्या हस्ते लावलेले कडुनिंबाचे झाड ही स. प. महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभाग उद्यानाची मोठीच श्रीमंती. श्रेया व प्रथमेश कवडे या छोट्यांनी बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या उद्यानातील झाडावेलींची ओळख करून घेतली. 

‘नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९३१ मध्ये स. प. महाविद्यालयात कडुनिंबाची चार झाडे लावण्यात आली. अठ्ठ्याऐंशी वर्षांची ही झाडं आजही आम्हाला मायेची सावली देत आहेत,’ अशी भावना उपप्राचार्य डॉ. अनिल दुसाने यांनी व्यक्त केली. आज पर्यावरण दिनानिमित्त ‘सकाळ’च्या बालवाचकांना शुभेच्छा दिल्या. 

ते म्हणाले, ‘‘आमच्या बागेत काही जागा अशा आहेत, जेथे निरनिराळ्या पक्ष्यांचा संवाद स्पष्टपणे ऐकू येतो. टिळक रस्त्यासारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणापासून काहीच पावलं अंतरावर आपण आहोत, यावर विश्वास बसत नाही. इथं अनेक जुनी झाडं व औषधी वनस्पती आहेत.’’

श्रेयाने या बागेत मनसोक्त छायाचित्रं काढली. प्रथमेशने विविध वनस्पतींची माहिती लिहून तर घेतलीच, शिवाय काही झाडांची रेखाचित्रंही काढली. झाडं माणसांना काय सांगू पाहत आहेत, या अर्थाचं मनोगत श्रेयाने झाडांना वंदन करून बोलून दाखवलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir Raman memories