लाखोंची मालमत्ता बहिणींनी भावासाठी सोडली विनामोबदला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पुणे जिल्ह्यात जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि भावकीच्या वाटपामुळे कमी होत चाललेले जमीन क्षेत्र याचा विचार केला असता एक फूटभर जमीन देखील कोणी कोणाला सोडण्याच्या तयारीत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु, कायद्याने आपल्या वाट्याला आलेली लाखमोलाची जमीन कुठलाही मोबदला न घेता आपल्या भावाला देऊन गोनवडी (ता. खेड) येथील मोहिते कुटुंबाच्या बहिणींनी एक आदर्श घालून दिलेला आहे. त्यांच्या या बंधुप्रेमाचे समाजात आणि नातेवाइकांत कौतुक होत आहे.

आंबेठाण - पुणे जिल्ह्यात जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि भावकीच्या वाटपामुळे कमी होत चाललेले जमीन क्षेत्र याचा विचार केला असता एक फूटभर जमीन देखील कोणी कोणाला सोडण्याच्या तयारीत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु, कायद्याने आपल्या वाट्याला आलेली लाखमोलाची जमीन कुठलाही मोबदला न घेता आपल्या भावाला देऊन गोनवडी (ता. खेड) येथील मोहिते कुटुंबाच्या बहिणींनी एक आदर्श घालून दिलेला आहे. त्यांच्या या बंधुप्रेमाचे समाजात आणि नातेवाइकांत कौतुक होत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गोनवडी हे चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचमध्ये येणारे गाव. गावात एमआयडीसी येत असल्याने आणि सध्या जमिनींचा मोबदला वाटप सुरू असल्याने लाखो लोकांच्या नजरा या भागात असणाऱ्या जमिनीवर आहेत.  

गोनवडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ मोहिते हे येथील अल्पभूधारक शेतकरी. जमीन अवघी तीन एकर असून त्यात बहिणींचा हिस्सा. शेतीतून कुटुंबाची उपजीविका चालत नसल्याने जोड म्हणून कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात. जमिनीत बहिणींनी वाटा घेतला तर भावाच्या वाट्याला अवघी काही गुंठे जमीन येईल अशी परिस्थिती. परंतु आजवर लहानपणापासून आपण ज्या भावाबरोबर एकत्र खेळलो, एकत्र वाढलो, शाळेत गेलो त्याच भावाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत हिस्सा घेऊन बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये, म्हणून मोहिते यांच्या सात बहिणींनी भावाला सर्व मालमत्तेतून हक्कसोड पत्र करून देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

सुमित्रा निवृत्ती पडवळ (बोरदरा), विमल लक्ष्मण कोळेकर (करंजविहिरे), सुमन पोपट पवार (बिरदवडी), इंदूबाई कैलास पवार (बिरदवडी), आशा चंद्रकांत दिवसे (कान्हेवाडी), उषा भरत भोसले (ठाकूरपिंपरी), अलका छबू बालघरे (देहूरोड) या बहिणींनी भावाला वडिलांच्या मालमत्तेततून हक्कसोड करून दिले आहे. या कुटुंबाला कायदेशीर कामात सुयोग अशोक शेवकरी यांनी मदत केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sisters left millions free of properties for brother motivation humanity