कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याच्या तपासासाठी "एसआयटी'ची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - कॉसमॉस बॅंकेचा, एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून 94 कोटी 42 लाख रुपयांच्या ऑनलाइन दरोड्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.

पुणे - कॉसमॉस बॅंकेचा, एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून 94 कोटी 42 लाख रुपयांच्या ऑनलाइन दरोड्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.

पोलिसांच्या या विशेष पथकाकडून आता कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन पैसे चोरण्याच्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे, त्यासाठी मुंबई, हैदराबाद येथील सायबर तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयात असलेला, एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सनी शनिवार ते सोमवार या काळात 94 कोटी रुपये 42 लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती. त्यापैकी बहुतांश पैसे 29 देशांमधील एटीएममधून काढण्यात आले, तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने वर्ग केली होती.

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली "एसआयटी'चे पथक काम करणार आहे. त्यामध्ये सायबर व गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी; तसेच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, सहा पोलिस कर्मचारी व सायबर तज्ज्ञांचा समावेश आहे.

कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याप्रकरणी पोलिसांना कोल्हापूर, मुंबई, पुणे व इंदूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणामध्ये "कोल्हापूर कनेक्‍शन'वर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले असून, त्यादृष्टीने पोलिसांचे एक पथक तपासासाठी कोल्हापूरला रवाना झाले आहे. संबंधित ठिकाणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्‍यता आहे.

राज्य पोलिस दलाच्या सायबर सिक्‍युरिटी विभागाचे प्रमुख ब्रिजेश सिंग यांनी बुधवारी पोलिस आयुक्तालयात भेट दिली. त्यामध्ये शहर सायबर सेलचे अधिकारी, बॅंकेच्या सायबर विभागाचे तज्ज्ञ, हैदराबाद व मुंबई येथील सायबर फॉरेन्सिक एक्‍स्पर्ट यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

'कॉसमॉस बॅंकेच्या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही विशेष पोलिस पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. "एसआयटी'च्या प्रमुख ज्योती प्रिया सिंह या संपूर्ण तपासाला गती देतील. आमच्यासाठी या प्रकरणाचा तपास करणे आव्हानात्मक असेल; परंतु नक्कीच हे प्रकरण उघडकीस आणू. त्यासाठी मध्यवर्ती तपास यंत्रणाही मदत करेल.''
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त.

Web Title: SIT for Cosmos bank Online Robbery Crime