पुणे शहरात विनयभंगाच्या सहा घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

पुणे शहरात हडपसर, माळवाडी, धनकवडी, सुतारदरा, वाघोली आणि फुरसुंगी अशा विविध सहा ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.

Pune Crime : पुणे शहरात विनयभंगाच्या सहा घटना

पुणे - शहरात हडपसर, माळवाडी, धनकवडी, सुतारदरा, वाघोली आणि फुरसुंगी अशा विविध सहा ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. त्या त्या भागातील पोलिस ठाण्यांत याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१९ पासून १४ फेब्रुवारी दरम्यान हे प्रकार घडले आहे. याबाबतचे गुन्हे गेल्या दोन दिवसांत दाखल झाले.

पहिली घटना :

वॉट्सअपवर मेसेज करून व फोन करून तरुणीला प्रपोज करणाऱ्या नीरज रमेश जगताप (रा. माळवाडी हडपसर) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर येथील माळवाडी येथे घडला. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

दुसरी घटना :

पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी पाठीवरून हात फिरवून विनयभंग केला. १४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धनकवडी येथे हा प्रकार घडला. याबाबत फिर्यादीच्या पतीने त्या दोघांना जाब विचारला असताना दोघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. याबाबत एका २९ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिसरी घटना :

वॉट्सअपवर व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल करून तू मला आवडतेस, मला तुला भेटायचे आहे म्हणत वारंवार त्रास देऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुतारदरा येथे राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान घडला.

चौथी घटना :

लाइट मिटर बघण्यासाठी आलेल्या महिलेला अश्लील शिवीगाळ करून लोखंडी सळईने मारहाण करत कुर्ता फाडून विनयभंग करणाऱ्या दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमजिंतसिंग हरकेनसिंग सिंधु आणि एका महिलेवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० फेब्रुवारी रोजी येरवड्यातील आर्यनननगर झोपडपट्टी येथे हा प्रकार घडला.

पाचवी घटना :

इन्स्टाग्राम अकाउंटवरूनअश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्यानंतर एका महिलेच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वाघोली येथे राहणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून मध्यप्रदेश येथील सतीश मीना नावाच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १८ नोव्हेंबर ते एक डिसेंबर २०२२ घडला.

सहावी घटना :

महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग करणाऱ्या संदीप बाबासाहेब थोरात (वय २८, रा. दौंड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान घडला. फिर्यादी आणि आरोपी हे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. वाद झाल्यानंतर त्यांनी वेगळे राहण्यास सुरवात केली.

टॅग्स :punecrimeMolestation