आळंदीमध्ये वर्षभरात सहाच विवाह नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

आळंदी - येथील ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू करून एक वर्षे झाले, मात्र प्रतिसाद कमी आहे. येथे गेल्या वर्षभरात अवघ्या सहा जोडप्यांचीच विवाह नोंदणी केली असल्याचे उघड झाले आहे.

आळंदी - येथील ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू करून एक वर्षे झाले, मात्र प्रतिसाद कमी आहे. येथे गेल्या वर्षभरात अवघ्या सहा जोडप्यांचीच विवाह नोंदणी केली असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर. जाधव यांनी सांगितले, की मागील जून महिन्यापासून आळंदी ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू केले आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारीही नेमण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरात अवघ्या सहा जणांनीच विवाह नोंदणी सुरू केली आहे. वास्तविक, आळंदीची लोकसंख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे विवाह संख्या जास्त आहे. मात्र, नागरिकांमध्ये विवाह नोंदणीबाबत जागृतता कमी असल्याचे जाणवते.

आळंदी पालिकेचे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी नुकतेच त्यांच्या चुलत बहिणीच्या विवाहाची नोंदणी केली. विवाह नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद पाहून त्यांनी जनजागृतीसाठी प्रसिद्धी पत्रक आणि स्थानिक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून कार्यालय चालकांची बैठक घेऊन त्यांच्यामार्फतही जनजागृती करण्यासाठी लवकरच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींची बैठक लावू, असे सांगितले.

Web Title: six marriage registration in alandi